आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राचा यू-टर्न : गोधनाची व्याख्या बदलणार; म्हैस विक्रीवरील बंदी उठणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पशू बाजारात वधासाठी जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील बंदीवरून विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. आम्ही हा निर्णय मानणार नाही, असे सांगत पश्चिम बंगाल, पुडुचेरी व  केरळ सरकारांनी केंद्रांचा निर्णय धुडकावून लावला आहे. केंद्राचा कायदा बेदखल करण्यासाठी केरळ सरकार नवीन कायदाही करू शकते. या बंदीच्या विरोधात सोमवारी केरळ उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधाची धार बोथट करण्यासाठी केंद्र सरकार या कायद्यात दुरुस्ती करू शकते. ‘गोधना’ची व्याख्या बदलण्याबाबत केंद्र विचार करत आहे. म्हशीला ‘गोधन’ या व्याख्येतून  वगळले जाऊ शकते.केंद्राने थेट बीफवर बंदी आणली नसली तरी नव्या कायद्याद्वारे केंद्र मागच्या दाराने बीफ बंदीचा प्रयत्न करत असल्याचे या निर्णयाच्या विरोधकांचे म्हणणे आहे.

पर्यावरण मंत्रालयाने जनावरांप्रति क्रुरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर नियम असलेली ‘पशूविरुद्ध क्रूरता प्रतिबंधक ( पशू बाजार नियमन) कायदा-२०१७ ची अधिसूचना २३ मे रोजी जारी केली. यामुळे निर्यात व रोजगारावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
केरळात खुलेआम वासरू कापल्याने वाद, गुन्हा दाखल
केरळमध्ये खुलेआम वासरू कापल्याप्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. काँग्रेस आंदोलनादरम्यान ही घटना घडली होती. काँग्रेसने कन्नूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रिजिल मकुट्ट्ी यांच्यासह जोशी कांडाथिल व शराफुद्दीन यांना पक्षातून निलंबित केले आहे. कोणत्याही सुसंस्कृत समाजात अशा प्रकारचा व्यवहार स्वीकारला जाऊच शकत नाही, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विट करून घटनेचा निषेध केला आहे.  
 
आयआयटी विद्यार्थ्यांनी घेतला बीफ फेस्ट  
चेन्नईत आयआयटी- मद्रासच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्येच बीफ फेस्ट ठेवला. ७०-८० विद्यार्थ्यांनी बाहेरून बीफ मागवून खाल्ले. काय खायचे आणि काय खायचे नाही हे ठरवण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. डीएमके नेते स्टॅलिन यांनी केंद्राविरुद्ध ३१ मे रोजी चेन्नईत आंदोलनाची घोषणा केली.
 
बीफ फेस्टवर सेक्युलर गप्प का? 
लखनऊ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केरळमधील ‘बीफ फेस्ट’वर सवाल केला आहे. दिल्ली विद्यापीठ व जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घटनांवर बोलणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी बीफ फेस्टवर गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला.
 
भारताचा वर्षाकाठी ६१ हजार कोटींचा बीफ निर्यात बाजार असा
- २०१६-१७ या वर्षात भारताने म्हशीचे मांस व चामड्याच्या निर्यातीतून ६१००० कोटी रुपयांचा व्यापार केला आहे.
- २६ हजार कोटी रुपयांच्या म्हशीच्या मांसाची निर्यात.
- ३५ हजार कोटी रुपयांचे चामडे व चामडी उत्पादनाची निर्यात.
- ३५ लाख लाेकांचा रोजगार या उद्योगावर अवलंबून आहे.
 
पुढील स्लाइडवर वाचा, रमजान महिन्यातच का आणला कायदा?...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)​
बातम्या आणखी आहेत...