आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीच्या फॉर्म्यूल्यावर यू-टर्न: शहांच्या वक्तव्याने 75+ च्या 25 BJP नेत्यांच्या आशा पल्लवीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहांचे वक्तव्य या वर्षी होणाऱ्या गुजरात, हिमाचल, कर्नाटक आणि पुढील वर्षी होणाऱ्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष्य ठेवून असल्याचे मानले जाते. - Divya Marathi
शहांचे वक्तव्य या वर्षी होणाऱ्या गुजरात, हिमाचल, कर्नाटक आणि पुढील वर्षी होणाऱ्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष्य ठेवून असल्याचे मानले जाते.
नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी मध्य प्रदेशात पक्षाच्या बैठकीत सर्वांना चकित करून टाकणारे एक वक्तव्य केले. पंचाहत्तरी आेलांडलेल्या नेत्यांना निवडणूक लढवण्यास मनाई करणारा पक्षात कोणताही नियम नाही किंवा तशी परंपरादेखील नाही, असे ते म्हणाले होते. भाजपच्या हायकमांडने लवचिकपणा धारण केल्याने वय अवघे पाऊणशेमान असलेल्या सुमारे २५ नेत्यांच्या मनात पुन्हा राजकारणात परतण्याचा आशावाद पल्लवित झाला आहे. २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणूक किंवा विधानसभा निवडणूक असलेल्या पंधरा राज्यांतील नेत्यांचा त्यात समावेश आहे.
 
२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचाहत्तरीतील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नव्हते. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना देखील मार्गदर्शक मंडळापर्यंत मर्यादित ठेवले होते. त्या दरम्यान पक्षाने यापुढे ७५ वर्षे ही निवडणूक लढवण्याची कमाल मर्यादा आहे, असे स्पष्ट केले होते. एवढेच नव्हे तर भाजपचे सरकार असलेल्या राज्यांतही हा फॉर्म्युला राबवण्यात आला होता. गुजरातमध्ये मुख्यमंत्री राहिलेल्या आनंदीबेन पटेल यांना पंचाहत्तरी आेलांडल्याबरोबर खुर्ची सोडावी लागली होती. खरे तर भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३६० हून अधिक जागी विजय मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे कठीण लक्ष्य ठेवण्याची रणनीती ठरवताना हायकमांडला मनासारखा निकाल हवा असल्यास ज्येष्ठ  व अनुभवी नेत्यांना महत्त्व द्यावे लागेल, हे उमजले. म्हणूनच शहा यांनी चतुरपणे अघोषित सिद्धांतानुसार लवचिकपणाचे संकेत दिले आहेत.

शहा यांची रणनीती: ‘मिशन-२०१९’मध्ये अनुभवी नेत्यांचे सहकार्य मिळत राहावे; बंडखाेरांचा धाेकाही कमी राहील
- शहा यांचे विधान गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटकमध्ये या वर्षी हाेणाऱ्या व मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये पुढील वर्षी हाेणाऱ्या निवडणुकांसाठी महत्त्वपूर्ण अाहे. याबाबत भाजपच्या एक रणनीतीकाराने सांगितले की, यामुळे पंचाहत्तरी पार केलेल्या नेत्यांचा उत्साह कायम राहील. तसेच निवडणुका हाेणाऱ्या राज्यांतील पहिल्या पिढीच्या नेत्यांना सक्रिय ठेवण्याची ही रणनीती अाहे, जेणेकरून अंतर्गत गटबाजी वा बंडखाेरांचा धाेका कमी राहील.
- येत्या काही दिवसांनंतर हाेणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनुभवी चेहरे अाणण्याचे संकेतदेखील अाहेत. कारण सत्ता-संघटनेतील नियुक्तींसंदर्भात अातापर्यंत जेवढे व ज्या प्रकारचे प्रयाेग झाले, त्यांचे परिणाम समाधानकारक नसल्याची जाणीव भाजप व सरकारच्या प्रमुख नेतृत्वाला झाली अाहे.
- कर्नाटकात भाजप ७४ वर्षीय बी.एस.येदियुरप्पा यांच्या भरवशावर अाहे. त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवले अाहे; परंतु येथे भाजप सत्तेत अाल्यास पंचाहत्तरी पार केल्यानंतर येदियुरप्पांना हटवले जाईल, अशी चर्चा अाहे. याच्या अटकळींना पूर्णविराम लागेल.
- अन्य पक्षांतून अालेल्या पंचाहत्तरी पार नेत्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न. यात माजी विदेशमंत्री एस.एम.कृष्णा अादींची नावे अाहेत. गुजरातमध्ये काँग्रेस साेडलेले शंकरसिंह वाघेला भाजपमध्ये येऊ शकतात.
- यूपीच्या फाॅर्म्युल्याच्या अाधारे कलराज मिश्र यांना कॅबिनेटमधून विश्रांती मिळण्याचा अंदाज अाहे. मात्र, पूर्वांचलमधील ब्राह्मणांमध्ये पक्षाप्रती सकारात्मकता दिसून येत नाही. अशा स्थितीत कलराज मिश्र मंत्री बनून राहतील.

यांना फायदा: ७३ वर्षीय धूमल होऊ शकतात हिमाचल सीएम पदाचे दावेदार
- सुमित्रा महाजन (७४): लोकसभेचे तिकीट मिळू शकते.
- शांता कुमार (८२): हिमाचलचे माजी मुख्यमंत्री. सध्या खासदार. मंत्री किंवा मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत समावेश शक्य.
- प्रेमकुमार धुमल (७३): हिमाचलचे माजी मुख्यमंत्री. या वेळी जे.पी. नड्डांना संधीची शक्यता. दावेदारी करू शकतात.
- गुलाब चंद कटारिया (७२), अमरा राम (७४) राजस्थानात मंत्री. पुढेही राहण्याची शक्यता. राज्यात विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल यांना पुढे संधी मिळू शकते.
- ननकीराम कंवर (७४): छत्तीसगडच्या मागील सरकारमध्ये गृहमंत्री होते. सध्या आमदार नाही. पुन्हा सक्रिय होऊ शकतात.
- भगत सिंह कोश्यारी (७५) उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री. आता केंद्रात मंत्री किंवा राज्यात मोठी भूमिका मिळू शकते.
- हुकूमदेव यादव (७७) बिहारचे खासदार. उपराष्ट्रपती पदासाठी नाव होते. आता मंत्रिपदावर नजर ठेवू शकतात.
- सी. पी. ठाकूर (८५) बिहारचे खासदार. सध्या बाजूला पडले. अनुभवाला प्राधान्य मिळाल्यास पुन्हा सक्रिय होऊ शकतात.  

यांना बसला फटका : अडवाणी आणि जोशींसारखे नेते फक्त मार्गदर्शक
- लालकृष्ण अडवाणी (८९), मुरली मनोहर जोशी (८३). मंत्री आणि राष्ट्रपती पदापासून वंचित. संघटनेत मार्गदर्शक मंडळापर्यंत सीमित. मंडळाची अद्याप एकही बैठक नाही.   
- आनंदीबेन पटेल (७५) : गुजरातच्या मुख्यमंत्री होत्या. वयाच्या सूत्रामुळे पदावरून हटावे लागले होते.   
- नजमा हेपतुल्ला (७७) : मध्य प्रदेशमधून राज्यसभा खासदार, केंद्रात अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री होत्या. ७५ वय झाल्याने अनिच्छेने पद सोडावे लागले. आता राज्यपाल.  
- यशवंत सिन्हा (८४) : झारखंडच्या हजारीबागमधून विजयी होत होते. अटल सरकारमध्ये वित्त-परराष्ट्रमंत्री होते. या वेळी मुलाला तिकीट मिळाले. जून २०१५ मध्ये टिप्पणी केली- भाजपात ७५ पार केलेल्यांना ब्रेन डेड घोषित केले आहे.
- त्याशिवाय उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बी. सी. खंडुरी (८२), जसंवत सिंह (७९), अरुण शौरी (७५), लालजी टंडन (८२), कल्याण सिंह (८५), केशरीनाथ त्रिपाठी (८२) यांसह अनेक नेत्यांना वयामुळे सक्रिय राजकारणातून दूर केले.
बातम्या आणखी आहेत...