आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रात फेरबदलाचे वारे: अर्थमंत्री जेटलींच्या जागी गोयल येण्‍याची शक्‍यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चेला दिल्लीत पुन्हा उधाण आले आहे. देशातील अर्थव्यवस्थेची घडी ताळ्यावर आणण्‍यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात बदल करण्यासाठी मोदी आग्रही आहेत. प्राप्त माहितीनुसार जानेवारी अथवा फेब्रुवारीत खांदेपालट होण्‍याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोदींनी २७ रोजी केंद्रीय मंत्र्यांची एक बैठक बोलाविली असून त्यातच ते याबाबत ‘मन की बात’ मांडतील. परंतु भाजपचे संघटनेतील बडे पदाधिकारी किंवा मंत्री यावर अधिकृत भाष्य करायला तयार नसले तरीही नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनीही बदलाचे संकेत दिले आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांचे खाते बदल्यात येणार व ती जबाबदारी ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात येणार अशी जोरदार चर्चा आहे. परंतु यंदाचा अर्थसंकल्प हा जेटलीच मांडतील असा विश्‍वास भाजपच्या एका राष्ट्रीय उपाध्यक्षाने व्यक्त केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होईल. मात्र, मंत्रिमंडळातील खांदेपालटाची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंतच पूर्ण होऊ शकते. स्मृती इराणी, नजमा हेपतुल्ला, मनेका गांधी, धर्मेंद्र प्रधान यांच्या विभागातही बदल होण्‍याची शक्यता आहे. यावर्षी आसाम, प.बंगाल, तामिळनाडू, केरळ व फेरबदल होतील. बेताल बोलणा-या साध्वी निरंजन देवी व गिरीराज सिंह यांना घरी जावे लागण्याची शक्यता आहे.जेटली अर्थमंत्री म्हणून अपेक्षित प्रभाव दाखवू शकले नाहीत. तरीही त्यांच्याकडील खाते काढून घेणे ही अशक्यप्राय बाब आहे. परंतु मोदी ऐनवेळी कोणती भूमिका घेतील याचा अंदाज आम्‍हालाही बांधता येत नाही, अशी प्रतिक्रिया एका राष्ट्रीय महिला पदाधिकाऱ्याने दिली. व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर असलेले विद्यमान ऊर्जा मंत्री पीयूष गोयल हे वित्त मंत्री होऊ शकतात या वृत्ताला कोणताही आधार नसल्याची प्रतिक्रिया भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळत आहे.
५१ वर्षांचे गोयल यांनी दीड वर्षात सौर उर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली. बदनाम झालेल्या कोल इंडियाची घडी बसवण्यात गोयल यशस्वी ठरले आहेत. त्यांचे संघटनेत असतानापासूनचे कौशल्‍य, त्यांची काम करण्याची पद्धती आणि उर्जा विभागाला त्यांनी दिलेला न्याय याबाबी पाहता त्यांच्या पदोन्नतीची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास केंद्रात महाराष्ट्राचे वजन वाढेल. परंतु एका वजनदार नेत्याचा यावर विश्वास नाही. त्यापेक्षा दिल्लीतून आयआयटी झालेले आणि हावर्ड बिझनेस स्कुलमधून शिक्षण घेतलेले केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा हे सर्वोत्तम वित्त मंत्री होऊ शकताता; मोदींनी जर जेटली यांना बदलायचेच असेल तर ते सिन्हांचा पर्याय निवडतील अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. खांदेपालटाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान मोदींवर कोणताही दबाव आणत नसल्याचे संघटनेच्या एका नेत्याने स्पष्ट केले असले तरी ते आपल्या भावना मोदींपर्यंत पोहचवितात याला दुजोरा दिला.
केवळ वातावरण निर्मिती
खांदेपालटाचे वृत्त हे केवळ मंत्र्यांनी चांगले काम करावे यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठीचे असल्याचेही महाराष्ट्रातील केंद्रात असलेले एक मंत्री बोलून गेले. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हाही होऊ शकतो, त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन हा अडथळा ठरू शकत नाही असेही या मंत्र्याने सांगितले.