आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सम-विषम योजनेतून महिला, दुचाकीस्वारांना वर्षभर वगळा; दिल्ली सरकारची फेरयाचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सम-विषम योजनेतून महिला तसेच दुचाकीस्वारांना वगळण्यात यावे, अशी मागणी करणारी फेरयाचिका दिल्ली सरकारने सोमवारी राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) सादर केली. आता याप्रकरणी मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.  

एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती (निवृत्त) स्वतंत्रकुमार यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर फेरविचार याचिका सादर केली. तीत म्हटले आहे की, सम-विषम योजनेतून महिला व दुचाकीस्वारांना वगळण्यात यावे. तसे न झाल्यास महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित होईल. सम-विषम योजनेच्या अंमलबजावणीमुळे दुचाकीस्वारांना खूप त्रास होऊ शकतो. या योजनेतून महिला चालकांना वगळले नाही तर सार्वजनिक बसमधून प्रवास करताना महिलांना गर्दीमुळे त्रास होऊ शकतो. सुरक्षितता नसल्यामुळे महिला बसमधून प्रवास करणार नाहीत. त्यामुळे या योजनेच्या उद्देशालाच धक्का बसू शकतो. दिल्ली सरकार सार्वजनिक वाहतुकीसाठी वर्षभरात २००० बस खरेदी करणार आहे. तोपर्यंत महिला तसेच दुचाकीस्वारांना या योजनेतून वगळण्यात यावे.  

दिल्ली सरकारने १३ नोव्हेंबरपासून पाच दिवस सम-विषम योजनेची अंमलबजावणी करण्याचा मानस व्यक्त केला होता. पण कुठलीही व्यक्ती किंवा अधिकारी आणि दुचाकीस्वार यांना सवलत देण्यात येणार नाही, या अटीवर एनजीटीने ११ नोव्हेंबरला या योजनेला परवानगी देऊ, असे म्हटले होते. त्यानंतर दिल्ली सरकारने सम-विषम योजनेची अंमलबजावणी करण्याची योजना मागे घेतली होती.  
 
प्रदूषणप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या केंद्र सरकार, राज्य सरकारांना नोटिसा 
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकार तसेच उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब सरकारला नोटिसा काढून त्यांचे उत्तर मागवले आहे. विधिज्ञ आर. के. कपूर यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, रस्त्यांवरील वाढती धूळ आणि पंजाब तसेच हरियाणात पिकांचे खुंट जाळण्यात आल्यामुळे एनसीआर आणि आसपासच्या भागांत प्रदूषणाच्या पातळीत धोकादायक वाढ झाली आहे. या दोन्ही समस्यांवर उपाययोजना करण्याचे निर्देशसंबंधितांना द्यावेत, त्याशिवाय सम-विषम योजनेची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात यावी. 
 
हवेच्या गुणवत्तेत सतत चढउतार : गोपाल राय  
दिल्लीतील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात गेल्या ४८ तासांत सातत्याने चढउतार होत आहे. पर्यावरण विभागातील वैज्ञानिक त्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 
बातम्या आणखी आहेत...