नवी दिल्ली - अंजू मंगला तिहारच्या पुरुष तुरुंगाच्या पहिल्या महिला तुरुंगाधिकारी झाल्या आहेत. पुरुष कैद्यांसाठी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती होणे ही तिहारच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. आतापर्यंत महिला तुरुंगाधिकाऱ्यांना महिला तुरुंगाचीच जबाबदारी सोपवली जात होती.
तिहारमध्ये ९ वेगवेगळे तुरुंग आहेत. अंजू यातील सात क्रमांक तुरुंगाच्या अधीक्षक आहेत. या तुरुंगात १८ ते २१ वयोगटातील ८०० पेक्षा जास्त कैदी आहेत. त्यात बहुतांश चोरी व खिसा कापण्याच्या प्रकरणात जेरबंद आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चोरी व तिसऱ्या क्रमांकावर अत्याचाराचे आरोपी आहेत. याआधी अंजू मंगला तिहार महिला तुरुंग क्रमांक सहाच्या अधीक्षक होत्या. यासंदर्भात अंजू म्हणाल्या, मला मिळालेल्या जबाबदारीबाबत मी समाधानी आहे. मात्र, त्याचबरोबर हे आव्हानही मोठे आहे. मी स्वत:ला सिद्ध करून दाखवेन. कोणत्याही तुरुंगातील कोणताही कैदी गुन्हेगार म्हणून बाहेर पडू नये याचा प्रयत्न मी करेन. त्यासाठी त्यांच्यासोबत विविध प्रयोग करत आहे. सकाळी पीटी व मार्च पास्ट केल्यानंतर जवळपास चार तास त्यांना शिकवले जाते. निरक्षरांना शिकवले जात आहे. कमी शिकलेल्यांना पुढील शिक्षण दिले जात आहे. परीक्षा घेतल्या जात आहेत. याशिवाय कैदी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावेत यासाठी रोज दोन तास त्यांचे खेळ घेतले जातात. व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट, लुडो, कॅरम आणि बुद्धिबळासारखे खेळ ते खेळतात. कैद्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करते. कैद्यांना अवघडलेपणा वाटू नये यासाठी ड्यूटी संपल्यानंतरही त्यांना बोलत असते. पुरुष कैदी तुमच्याशी गैरवर्तन करत नाहीत का, या प्रश्नावर अंजू म्हणाल्या, त्यांनी नको असलेल्या परिस्थितीत गुन्हा केला आहे, त्यांची ती सवय नाही.
किरण बेदी तिहारच्या सर्व तुरुंगांच्याप्रभारी महानिरीक्षक होत्या
याआधी किरण बेदी यांनी तिहार तुरुंगाच्या प्रभारी महानिरीक्षक म्हणून काम केले होते. त्यांच्या अखत्यारीत सर्व तुरुंग होते. मात्र, त्यांनीही यातील पुरुष तुरुंगाची जबाबदारी पुरुष अधिकाऱ्यावर सोपविली होती. त्यांच्यानंतर कोणीही पुरुष तुरुंगात महिला अधीक्षकाची नेमणूक केली नाही.