इस्लामाबाद/नवी दिल्ली - पाचवर्षीय मुलाची त्याच्या पाकिस्तानी आईशी भेट घडवून आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल भारतीय प्रशासनाचे आभार मानले आहेत. या मुलाच्या वडिलांनी आईशी खोटे बोलून या मुलाला भारतात आणले होते. ‘या प्रकरणात सहकार्य केल्याबद्दल आम्ही भारतीय प्रशासनाचे आभारी आहोत,’ असे ट्विट पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केले.
इफ्तेखार अहमद असे या पाच वर्षांच्या मुलाचे नाव आहे. भारतीय प्रशासनाने त्याला शनिवारी वाघा सीमेवर त्याच्या आईकडे सुपूर्द केले. इफ्तेखारची आई रोहिना कियानी यांनी या घटनेची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘मी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये राहते. जम्मूच्या गांदरबल भागात राहणारे इफ्तेखारचे वडील गुलजार अहमद यांनी मार्च २०१६ मध्ये त्याला एका लग्नाला घेऊन जात आहे, असे सांगितले. आधी त्याला दुबईला नेले आणि नंतर तेथून थेट गांदरबल येथील आपल्या घरी नेले. त्यानंतर त्याने इफ्तेखारला पाकिस्तानमध्ये परत पाठवण्यास नकार दिला.’ मुलगा परत मिळवण्यासाठी रोहिना कियानी यांनी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या मदतीने भारतीय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पाकिस्तानी उच्चायुक्तालयाने हे प्रकरण लावून धरले. इफ्तेखार हा पाकिस्तानी आहे, हे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने रोहिनाच्या बाजूने निकाल दिला आणि मुलाला आईकडे सोपवावे, असा आदेश दिला.
मे २०१६ मध्ये न्यायालयाने निकाल दिला असला तरी सीमेवरील तणावामुळे इफ्तेखार घरी जाऊ शकला नव्हता. रोहिना यांच्या विनंतीवरून भारतीय अधिकारी आणि दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी सक्रिय झाले आणि इफ्तेखारला त्याच्या घरी पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. अखेर शनिवारी ५ वर्षांच्या इफ्तेखारची आईशी भेट झाली.
मुलगा परत मिळण्याची आशा सोडली होती : रोहिना
इफ्तेखारची आई रोहिना कियानी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, मुलगा परत मिळेल, ही आशा मी सोडली होती. मुलगा परत आल्याने मी अत्यंत आनंदी आहे. माझ्यासाठी हे आश्चर्यापेक्षा वेगळे नाही. मुलगा परत मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारने मदत केली आहे. मी सरकारचे आभार मानते.