आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाॅप बी-संस्थांतील परदेशी प्लेसमेंटमध्ये ३५% घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा परदेशात नोकरीच्या आॅफर कमी झाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला देशी कंपन्यांत नोकऱ्यांची संख्या तर वाढली आहेच, जोडीला पॅकेजही तगडे मिळाले आहे. तथापि, परदेशी कंपन्या भारतीय विद्यार्थ्यांना देशातच चांगल्या संधी देत असल्याचेही चित्र आहे.

देशातील अाघाडीच्या बी-संस्थांमध्ये यंदा परदेशातील नोकऱ्यांच्या आॅफर्समध्ये २५ ते ३५ टक्क्यांची घसरण झाली. प्लेसमेंटच्या प्रक्रियेत दरवर्षी हिरीरीने भाग घेणाऱ्या अनेक कंपन्यांनी यंदा त्याकडे पाठ फिरवली. शिवाय अनेक कंपन्यांनी गतवर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी कमी नोकऱ्या दिल्या. अर्थात एमबीए पदवीधरांच्या प्लेसमेंटच्या स्थितीत काहीशी सुधारणा निश्चित आहे. सर्वाधिक आणि सर्वांत कमी पॅकेजमध्ये १५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. त्याच वेळी नोकरीच्या आॅफर्सचा आकडाही १० ते १५ टक्क्यांनी वधारला आहे. असे असले तरी आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांमध्ये झालेली घसरण तज्ज्ञांना नकारात्मक पायंडा वाटत नाही.
आयआयएम बंगळुरूच्या प्लेसमेंट कमिटीचे प्रमुख गणेश प्रभू यांनी दिव्य मराठी नेटवर्कशी बोलताना सांगितले की, विदेशी कंपन्यांसाठी भारत प्रमुख बिझनेस सेंटर ठरला असून, विद्यार्थ्यांना देशातच उत्तम संधी आणि पॅकेज मिळत आहेत. विदेशी कंपन्यांच्या प्लेसमेंटमध्ये यंदा घसरण झाली असल्याचेही प्रभू यांनी मान्य केले आहे. आयआयएम बंगळुरूत २०१५च्या तुलनेत २५ टक्के कमी विदेशी आॅफर मिळाल्या. गतवर्षी २३ विद्यार्थी निवडले गेले होते. यंदा हा आकडा १७ आहे. आयआयएम कोलकातामध्ये ही घसरण २० टक्क्यांची आहे. कोझीकोडमध्ये तर तब्बल ७४ टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली. आयआयएम लखनऊ, इंदूर आणि रांचीमध्येही अशीच परिस्थिती आहे. काशीपूर मात्र गतवर्षीचे प्रमाण राखण्यात यशस्वी ठरले आहे. परंतु एक्सएलआरआय जमशेदपूरसारख्या बी-संस्थांमध्ये एकही विदेशी आॅफर नाही. बहुतांश आंतरराष्ट्रीय संस्था निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा सरासरी पॅकेज सांगत नाहीत.

कारण अशा विद्यार्थ्यांची संख्या कमी असते अाणि पॅकेजमध्ये तफावतही मोठी असते. आयआयएम बंगळुरूच्या प्लेसमेंट कमिटीचे प्रमुख प्रभू यांच्या मते आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटमध्ये घसरण होण्यामागे विद्यार्थ्यांना यंदा लवकर आॅफर मिळाल्या हे आहे. विदेशी कंपन्या येण्याआधीच बहुतांश विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या होत्या. अर्थात ही घसरण म्हणजे काही वाईट संकेत नाही. बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी भारत मोठे बिझनेस सेंटर आहे. व्यवस्थापन पदवीधरांना ते येथेच तगडे पॅकेज देत आहेत. आयआयएम लखनऊचे डी.एस. सेंगर इंदूरच्या भव्या कपूरदेखील आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटमध्ये घसरण झाल्याचे मान्य करतात. आयआयएम कोझिकोडचे प्लेसमेंट प्रमुख ए.एफ. मॅथ्यू म्हणाले की, यंदा अनेक देशी कंपन्यांनीही विद्यार्थ्यांना परदेशात नोकऱ्या दिल्या आहेत.

३० ते ४० टक्के विद्यार्थी उद्यमशीलतेच्या वाटेवर
अायआयएमबंगळुरूच्या प्रा. संकर्षण बसू यांच्या मते भारताखेरीज बहुतांश प्रमुख देशांत आर्थिक विकासाचा दर गतवर्षीपेक्षा कमी राहीला. प्लेसमेंट प्रक्रियेत त्यांचा सहभाग नसण्यामागे हेही एक कारण आहे. मॅथ्यू यांच्या म्हणण्यानुसार ३० ते ४० % विद्यार्थी पुढे उद्यमशीलतेची वाट चोखाळू इच्छितात. त्यामुळे ते विदेशात जाऊ इच्छित नाहीत. त्यांनी देशातच बऱ्यापैकी नोकऱ्यांच्या आॅफर स्वीकारल्या आहेत. ते वर्षे अनुभव घेऊन हे विद्यार्थी उद्योजक होऊ शकतात.