आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फेशर्स’ना कमी पगार, ‘आयटी’ कंपन्यांची चाल, अायटी उद्योग क्षेत्रातील दिग्गज टी. व्ही. मोहनदास पै यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - आयटी क्षेत्रात नव्याने दाखल होत असलेल्या तरुणांना कमी पगार देण्यासाठी भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांनी एकमेकांशी हातमिळवणी केली आहे. या क्षेत्रात येत असलेल्या मोठ्या प्रमाणातील तरुणांचा फायदा घेण्यासाठी कंपन्या असे करत असल्याचा खुलासा आयटी क्षेत्रातील दिग्गज मानले जाणारे टीव्ही मोहनदास पै यांनी केला आहे. 
 
नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना कमी पगार देण्यासाठी मोठ्या कंपन्यांनी एकमेकांशी हातमिळवणी केली अाहे. हीच सध्या भारतीय आयटी उद्योगासमोरची मोठी समस्या असल्याचे मतही पै यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात पदार्पणातच योग्य पगार मिळत नाही.  
या संदर्भात तयार करण्यात आलेल्या अहवालातील निष्कर्षांनुसार वीस वर्षांपूर्वी या क्षेत्रात मिळणाऱ्या पगारापेक्षा आता घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना जास्त पगार देण्यात येऊ नये यासंबंधी कंपन्या एकमेकांशी चर्चा करत असून ही खूपच निराशाजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. पै देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे माजी सीएफओ आहेत. ते १९९४ ते २००६ पर्यंत इन्फोसिसमध्ये होते.
 
भारतीय अायटी कंपन्या गेल्या सात ते आठ वर्षांपासून असे करत असून भारतीय आयटी उद्योगासाठी हे चांगले संकेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांचा पगार वाढवण्यात आल्यास चांगले लोक या क्षेत्रात येतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या पै मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेसचे अध्यक्ष आहेत.
 
इन्फोसिसमध्ये ते मानव संसाधन विभागाचे (एचआर) प्रमुखही होते.  सध्या आयटी क्षेत्रात येणारे तरुण दुय्यम महाविद्यालयातील विद्यार्थी असतात. ते विद्यार्थीदेखील स्मार्ट असतात यात मला शंका नाही. मात्र, प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांनीदेखील या क्षेत्रात यावे ही या क्षेत्राची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. पगार कमी असल्यामुळे या क्षेत्रातील नोकरी सोडणाऱ्यांची संख्या खूपच जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.  ही संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...