आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगा पुनरुज्जीवनासाठी देणार पुरेसा निधी, उमा भारती यांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गंगोत्री ते गंगासागरपर्यंतच्या गंगा नदीप्रवाहातील अडथळे दूर करत प्रदूषणमुक्त गंगेचे स्वप्न गंगा पुनरुज्जीवन प्रकल्पातून आखण्यात आले आहे. या कामासाठी सरकार बांधील असून निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही, असे आश्वासन केंद्रीय जलस्रोतमंत्री उमा भारती यांनी सोमवारी दिले. त्या गंगा मंथन कार्यक्रमात बोलत होत्या.

उमा भारती म्हणाल्या, या प्रकल्पाशी संबंधित लोकांशी चर्चा केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधुनिक भगीरथ संबोधत त्यांच्या प्रयत्नांमुळेच गंगा नदीचा अंतर्भाव जलसंपदा विभागात करण्यात आला.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये गंगा शुद्धीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. नरेंद्र मोदी यांनी दोन्ही हात उंचावून भरभरून पाठिंबा दिला. गंगेच्या विषयात मोदी यांना किती आत्मीयता आहे हे माझ्या लक्षात आले. गंगा नदी राष्ट्रीय शुद्धीकरण मोहिमेअंतर्गत एका दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये देश-विदेशातील मान्यवर सहभागी झाले होते. या चर्चेच्या फलश्रुतीवर काम सकरण्यास आपले मंत्रालय बांधील आहे. गंगा शुद्धीकरणाशी संबंधित व्यक्तींशी चर्चा झडत आहेत. लवकरच त्यावर सकारात्मक निष्कर्ष निघेल, अशी आशा भारती यांनी व्यक्त केली. सुमारे 300 प्रतिनिधींशी चर्चा करून सरकार कृती योजनेला अंतिम स्वरूप देणार आहे.

सरकारला बनावट धर्मनिरपेक्षता मान्य नाही
आपले सरकार बनावट धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवत नाही. मी जेव्हा संत समाज असा उल्लेख करते तेव्हा तो केवळ हिंदू समाजाशी नव्हे, तर सर्व धर्मांशी संबंधित असतो. मी धर्माचा उल्लेख करत नाही. आमचा खर्‍या धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे. मी जेव्हा धर्म शब्दाचा वापर करते तेव्हा तो सर्व धर्मासाठी लागू असतो, असे उमा म्हणाल्या.

राजकीय इच्छाशक्तीत यश : गडकरी
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कमालीच्या राजकीय इच्छाशक्तीमध्ये या प्रकल्पाचे यश दडले आहे. इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे इच्छा असेल तर सर्वेक्षण, चर्चा, परिसंवाद, समिती, उपसमिती आणि संशोधन गट या गोष्टी येतात, यावर गडकरी यांनी भर दिला.
(फाईल फोटो)