आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केनियाला भारताने दिले 10 कोटी डॉलर्सचे कर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केनियाच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी भारताने १० कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केनियाचे अध्यक्ष उहरू केनयाट्टा यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. त्यात उभय नेत्यांनी विविध क्षेत्रांत सहकार्य वृद्धिंगत करण्यावर सहमती व्यक्त केली.  

उभय नेत्यांच्या बैठकीत सागरी सुरक्षेवर चिंता व्यक्त करण्यात आली. दोन्ही देशांनी भविष्यात संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्यावर सहमती दर्शवली आहे. हायड्रोग्राफी, संवाद व्यवस्था, पायरसी प्रतिबंधक यंत्रणा इत्यादी क्षेत्रांत मदतीची देवाणघेवाण करण्यावर मोदी-केनयाट्टा यांनी सहमती व्यक्त केली आहे. सुरक्षेच्या क्षेत्रात एक कार्य गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कार्य गट सायबर सुरक्षा, दहशतवाद, अमली पदार्थ प्रतिबंधक योजना, मानवी तस्करी, काळा पैसा इत्यादी क्षेत्रात भर देईल, असे बैठकीनंतर जाहीर करण्यात आले.  गेल्या वर्षी पंतप्रधानांनी केनियाला भेट दिली होती. त्याचे स्मरणही त्यांनी बैठकीतून करून दिले. दोन्ही देशांत आर्थिक सहकार्य वृद्धी करण्यासाठी सरकार अनुकूल आहे. 
भारताने केनियाला देऊ केलेल्या कर्जाच्या करारामुळे दोन्ही देशांतील संबंधांच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे. विकासातील बळकट भागीदार म्हणून दोन्ही देशांनी वाटचाल करावी, अशी अपेक्षा मोदी यांनी बैठकीतून व्यक्त केली. केनिया-भारत भविष्यात अधिक निकट येतील, असेही ते म्हणाले. 
 
द्विपक्षीय संबंधांवर भर  
मोदी-केनयाट्टा यांच्यातील चर्चेत उभय देशांतील द्विपक्षीय संबंधाला दृढ करण्यात येणार असल्याचा संकल्प करण्यात आला. दोन्ही देशांतील व्यापारही वाढवण्यात येईल. त्यासंबंधीची उद्योजकांची बैठक गुरुवारी होणार आहे. त्यासाठी उभय देश काही संयुक्त प्रकल्पांची उभारणी करणार आहे.