आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटीरतावाद्यांशी चर्चेवर पाकला सडेतोड उत्तर देण्याची भारताची व्यूहरचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (एनएसए) बैठकीआधी नवी चाल खेळली आहे. मात्र, त्याचबरोबर भारतानेही त्यास सडेतोड उत्तर देण्याची रणनीती आखली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी काश्मीर फुटीरतावाद्यांना नवी दिल्लीत चर्चेचे निमंत्रण दिले आहे. मात्र, त्याच्या उत्तरादाखल भारताने पाकिस्तानशी २३-२४ ऑगस्ट रोजी होणारी प्रस्तावित चर्चा रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वेळेस पाकिस्तानी उच्चायुक्ताने फुटीरतावाद्यांशी चर्चा केल्याच्या कारणावरून उभय देशांची विदेश सचिवस्तरावरील चर्चा याच कारणामुळे रद्द करण्यात आली होती.

अजीज भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा करण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी दिल्लीत येत आहेत. फुटीरतावाद्यांशी चर्चेमुळे भारत सरकार नाराज आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चर्चा झाल्यास पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले जाईल. नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्ताने काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली शहा गिलानी यांना अजीज यांच्याशी चर्चेसाठी २४ ऑगस्ट रोजी बोलावले आहे. उदार फुटीरतवादी समजले जाणारे मीरवाइझ उमर फारूक यांना उच्चायुक्तामध्ये दिल्या जाणाऱ्या मेजवानीमध्येही २३ रोजी निमंत्रित करण्यात आले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये काही वर्ग असा आहे
की, भारत-पाकिस्तान चर्चा निष्फळ करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भारतविरोधी हालचाली करून भारत सल्लागार स्तरावरील चर्चा रद्द करेल. फुटीरतावाद्यांशी चर्चा चिथावणीच्या दृष्टिकोनातून पाहिली जात आहे.
फुटीरतवाद्यांनी ईदमिलनवर टाकला होता बहिष्कार
हुरियतचे कट्टरपंथीय नेते गिलानी यांनी गेल्या महिन्यात पाकिस्तान उच्चायुक्ताने आयोजित केलेल्या ईदमिलन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी २१ जुलै रोजी त्याचे आयोजन केले हेाते. गिलानी यांनी रशियातील उफामध्ये भारत- पाकिस्तानच्या पंतप्रधानांदरम्यान १० जुलै रोजी झालेल्या चर्चेत काश्मिरींना सहभागी करून घेण्यास विरोध दर्शवला होता. हुर्रियत संघटनेने कायम देशविरोधी भूमिका घेतली. त्यातून हिंसाचाराला प्रोत्साहन मिळाल्याचे दिसते.
सरकारकडे विषय नाही, ना दृष्टिकोन : काँग्रेस
सरकारकडे चर्चेचा कृती आराखडा नाही. त्यांच्याकडे धोरण आणि दृष्टिकोन दोन्हीही नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी केला आहे. आज त्यांची पाकिस्तानशी चर्चा करण्याची इच्छा आहे, उद्या त्याचा ते इन्कार करतात. त्यांच्याकडून अचानक निवेदन प्रसिद्ध केले जाते. काँग्रेस पाकिस्तानी एनएसए आणि काश्मिरी फुटीरतावाद्यांशी चर्चेवर सरकारचे मत जाणून घेऊ इच्छिते. परंतु सरकारने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही.
हुरियत नेत्यांकडून मिळाला दुजोरा
हुरियतच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले की, एनएसए सरताज अजीज यांना भेटण्यासाठी दिल्लीला जात आहे. उमर फारूक म्हणाले, आपण अजीज यांच्या मेजवानीत सहभागी होण्यासाठी जात आहोत. काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांनी याला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन फारूक यांनी केले आहे.
सरहद्दीवर संयम बाळगावा; मून यांचे आवाहन
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमधील चर्चेचे स्वागत केले आहे. त्यांनी दोन्ही देशांना नियंत्रण रेषेवर संयम बाळगण्यास व नागरिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तान लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात तीन लष्करी चौक्यांवर गोळीबार केल्याचे भारताने एक दिवस आधीच म्हटले आहे.