आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पाक’चीत : चर्चा करायची तर फक्त आमच्याशी करा, फुटीरतावाद्यांशी नव्हे : भारत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / इस्लामाबाद - काश्मिरातील फुटीरतावाद्यांच्या मुद्द्यांवरून परस्परांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्यामुळे भारत-पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (एनएसए) रविवारची नियोजित बैठक रद्द झाल्यातच जमा असल्याचे शुक्रवारी जवळपास स्पष्ट झाले. फुटीरतावादी हुरियत नेत्यांशी पाकिस्तानचे एनएसए सरताज अजीज यांची चर्चा अजिबात स्वीकारार्ह नाही, असे भारताने पाकिस्तानला ठणकावल्यानंतर भारताच्या सांगण्यानुसार आम्ही काम करू शकत नाही, असे सांगत हुरियत नेत्यांशी चर्चा करण्याच्या मुद्द्यावर पाक अडून बसला आहे.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे त्यांचे समकक्ष सरताज अजीज रविवारी नवी दिल्लीत येत आहेत. पहिल्यांदाच ही बैठक होत आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार रविवार व सोमवार असे दोन दिवस ही बैठक चालणार आहे. रशियातील उफा येथे झालेल्या उभय देशांच्या पंतप्रधानांच्या भेटीत या बैठकीवर एकमत झाले होते. परंतु पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी अजीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी हुरियत नेत्यांना निमंत्रित केले आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. अजीज यांची हुरियत नेत्यांशी चर्चा अनुचित असून ती उफा करारातील भावनेच्या विरूद्ध ठरेल, असे शुक्रवारी सकाळीच भारताने स्पष्ट केले. त्यानंतर पाकिस्तानमध्ये वेगाने घडामोडी घडल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अजीज यांच्यासह महत्वाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ‘आम्ही भारताचा सल्ला ऐकणार नाही. हुरियत नेत्यांशी यापूर्वीही चर्चा होत आली आहे, यापुढेही होत राहील. आम्ही ही परंपरा खंडित करणार नाही,’ असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्त टी. सी. एस. राघवन यांना कळवले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाकिस्तानच्या या भूमिकेत तसूभरही फरक पडला नाही. त्यामुळे साडेसात वाजता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप माध्यमांसमोर आले. चर्चेत प्रगती होऊ द्यायची की नाही, याचा निर्णय आता पाकिस्ताननचे घ्यायचा आहे, असे सांगत त्यांनी चेंडू पाकच्या कोर्टात टोलवला. त्यानंतरही पाकच्या भूमिकेत कोणताही फरक पडला नाही. सरताज अजीज हे काश्मिरातील फुटिरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांची सोमवारी सकाळी ९.३० वाजता नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. दोन्हीपैकी एकाही देशाने ही चर्चा रद्द केल्याची औपचारिक घोषणा केली नसली तरी उभय देशांची ताठर भूमिका पाहता ही चर्चा रद्द झाल्यातच जमा आहे.
चर्चा रद्द करण्यासाठी पाककडून चिथावणी
भारत- पाकिस्तानच्या एनएसएच्या बैठकीकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे बैठक रद्द केल्याचे खापर आपल्या माथी फुटू नये, असे दोन्हीही देश काही करू इच्छित नाहीत. त्यामुळे पाकिस्तान भारताला चिथावणी देत आहे. काश्मीरचा राग आळवणे आणि हुरियत नेत्यांना चर्चेला बोलावणे हा त्याच कटाचा भाग आहे.

औपचारिक घोषणा नाही; पण एनएसए स्तरीय चर्चेची शक्यता कमीच
- तणातणी झाली तरी एकाही देशाने चर्चा रद्द केल्याची घोषणा केली नाही. मात्र तणाव पाहता चर्चेची शक्यता कमीच आहे.
- अजीज-डोभाल चर्चा झालीच तर सरकार फुटिरतावाद्यांना जम्मू- काश्मिरातच रोखण्याचा प्रयत्न करू शकते.
- दिल्लीत फुटीर नेते आलेच तर त्यांना अटक केली जाऊ शकते
चर्चा तत्काळ रद्दच करा : यशवंत सिन्हा
केंद्र सरकारने ही बैठक तत्काळ रद्दच केली पाहिजे. पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासीत यांना अनिष्ट व्यक्ती घोषित करून देशातून हाकलून दिले पाहिजे.
- यशवंत सिन्हा, ज्येष्ठ भाजप नेते
सरकारकडे स्पष्ट धाेरणच नाही : सिंह
मोदी सरकारची पाकिस्तानबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका नाही, हे अत्यंत दुर्दैव आहे. डळमळीत भूमिकेमुळे मोदी सरकार पाकला कठोर संदेश देण्यात अपयशी ठरले आहे.
- आर. पी. एन. सिंह, काँग्रेसचे प्रवक्ते
हुरियतच्या भेटीला उगीच महत्त्व दिले : अब्दुल्ला
उफामध्ये काश्मीरचे नाव घ्यायला विसरलेला हाच तो पाकिस्तान आहे का? हुरियत- पाकिस्तान चर्चेला एवढे मोठे करण्याचा विचार कोणाचा होता? मोदी सरकारने त्याला जास्तच महत्त्व दिले आहे.यापूर्वी अशा भेटींना फारसे महत्त्व दिले जात नव्हते. - उमर अब्दुल्ला, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री
मागच्या वर्षी भारताने रद्द केली होती परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चा
मागील वर्षीच्या ऑगस्टमध्ये पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी इस्लामाबादेतील दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चेआधी हुरियत नेत्यांना बोलावले होते. त्यामुळे आमच्याशी चर्चा करायची की फुटीरतावाद्यांशी हे आधी पाकिस्तानला ठरवावे लागेल, असे सांगत भारताने ही बैठकच रद्द केली होती.
पाकला रोखणारी अशी कोणती शक्ती आहे?
पाकिस्तानच्या अडेलतट्टू भूमिकेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले की, ‘दहशतवादाशी संबंधित सर्व मुद्द्यांबरोबरच सीमेवरील शांतता व स्थैर्यावर चर्चा होईल, असे दोन्ही पंतप्रधानांनी उफामध्ये ठरवले होते. परंतु त्यानंतर पाकडून सीमेवर चिथावणीखोर गोळीबार सुरू आहे. सीमेपलीकडून दहशतवादी हल्ल्यांतही वाढ झाली. उधमपूरची घटना हे त्याचे ताजे उदाहरण आहे. तेथे पाकच्या नागरिकाला जिवंत पकडले. एनएसएच्या चर्चेत हा मुद्दा आला असता तर पाकची अडचण झाली असती. पाकला चर्चेपासून रोखणारी कोणती शक्ती आहे, असे दोन्ही देशांचे लोक विचारू शकतात. शांततापूर्ण चर्चेसाठी भारत बांधील आहे. त्यामुळेच आम्ही उफामध्ये पुढाकार घेतला होता.’