नवी दिल्ली/ इस्लामाबाद - अग्नी-५ सारखी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्याची भारताची योजना दक्षिण आशियातील शांततेसाठी घातक असल्याचा कांगावा पाकिस्तानने एमटीसीआर (मिसाइल टेक्नाॅलॉजी कंट्रोल रेजीम) समूहाकडे केला आहे. या समूहाचे ३५ देश सदस्य असून भारताने नुकतेच याचे सदस्यत्व स्वीकाराले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तस्नीम असलम यांनी कोरियात आयोजित एमटीसीआरच्या बैठकीत म्हटले की, भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे आम्ही खूपच चिंतित आहोत. भारताचा सुरक्षा कार्यक्रम आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रामुळे प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यावर धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण आशियातील शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत आम्ही सहभागी होऊ इच्छित नाही. मात्र, या भागातील एकाही देशाकडून अन्य देशावर आण्विक हल्ला होऊ नये, यासाठी धैर्य बाळगण्यासंदर्भात करार व्हावा, अशा मताचे आम्ही असल्याचा कांगावाही असलम यांनी या वेळी केला. आम्ही शस्त्रास्त्रांचा प्रसार थांबवण्यासाठी जगभरातून होत असलेल्या प्रयत्नांमध्ये आमचे योगदान देत आहोत, असे बयान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून नुकतेच जारी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्र धोरणांबाबत आपण बरेच जागरूक असल्याचा कांगावा करत प्रत्येक प्रकारचे धोके टाळण्यासाठी मजबूत कंट्रोल सिस्टिम बनवली जावी, असे पाकिस्तानने एमटीसीआरचे अध्यक्ष हाम सांग वूक यांच्याकडे म्हटले आहे.
एमटीसीआरमधील राष्ट्रे
सुरुवातीला अमेरिका, कॅनडा, जर्मनी, जपान, इटली, फ्रान्स आणि ब्रिटन हे जी-७ देश एकत्र आल्यानंतर रशिया, दक्षिण कोरिया, डेन्मार्कसह ३४ राष्ट्रांचा यात समावेश झाला. भारताच्या समावेशामुळे ही संख्या ३५ वर पोहोचली आहे.
एमटीसीआर काय आहे?
मागच्या वर्षी जून महिन्यात अमेरिका दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमटीसीआरचे सदस्यत्व स्वीकारले होते. या समूहाची स्थापना जी-७ देशांनी १९८७ मध्ये केली होती. स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे आणि अन्य मनुष्यविरहित तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात मर्यादा ठरवणे, हा या स्थापनेमागचा मुख्य हेतू आहे. या समूहात समावेश झाल्याने आता भारताला जगभरातील उत्तमोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध करून घेण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे भारत अन्य देशांना आपले क्षेपणास्त्र तंत्रज्ञान देऊ शकतो.
पाकिस्तानच्या भीतीचे कारण काय?
भारताने नुकतेच अग्नी-४ आणि अग्नी-५ या क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले आहे. अग्नी-४ हे ३५०० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्यास सक्षम असून त्याद्वारे आण्विक शस्त्रास्त्रेही वाहून नेली जाऊ शकतात. दरम्यान, ५ हजार किलोमीटर क्षेत्रात मारा करू शकणाऱ्या अग्नी-५ क्षेपणास्त्राचीही भारताने यशस्वी चाचणी घेतली आहे. या परिघात पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, इराणसह सुमारे निम्मा युरोप येतो. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे बनवणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारताच्या शक्तीची भीती वाटत आहे.