आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जून महिन्यात किरकोळ महागाई दर 1.54 टक्के ; 5 वर्षांत सर्वात कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली   - भाज्या, डाळी आणि दुग्धजन्य उत्पादनांच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीमुळे जून महिन्यात महागाई दर कमी होऊन १.५४ टक्क्यांवर आला आहे. मे महिन्यात महागाई दर २.१८ टक्के होता. गेल्या वर्षी जून महिन्यात ५.७७ टक्के महागाई दर नोंदवण्यात आला होता. किरकोळ किंमत निर्देशांक (सीपीआय) वर आधारित महागाई दराचा हा आकडा गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी आहे. सीपीआयची  गणना जानेवारी २०१२ च्या नव्या सिरीजच्या आधारावर होत आहे.  
 
जून महिन्यात भाज्यांच्या किमती १६.५३ टक्के आणि डाळींच्या किमती २१.९२ टक्के कमी झाल्या. असे असले तरी फळे महाग झाली. धान्याचे दर ४.३९ टक्के आणि दुग्धजन्य उत्पादनांचे दर ४.१५ टक्के कमी झाले. मांस आणि माशा महाग झाल्या. जून महिन्यात यांच्या किरकोळ किमतीत १.६२ टक्क्यांची वाढ झाली.
 
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (सीएसओ) आकडेवारीनुसार खाद्यपदार्थांचा महागाई दर कमी होऊन शून्याच्या खाली २.१२ टक्के नोंदवण्यात आली. मे महिन्यात हा दर शून्याच्या खाली १.०५ टक्के होता. याचप्रमाणे  इंधन आणि वीज यातील महागाई दर जून महिन्यात कमी होऊन ४.५४ टक्क्यांवर आला. मे महिन्यात हा ५.४६ टक्के होता.  धोरण ठरवणाऱ्यांनी या आकडेवारीकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी सांगितले. याआधी इतकी कमी महागाई १९९९ आणि १९७८ मध्ये दिसून आली होती. या अामूलाग्र बदलाकडे कोणाचे लक्ष गेले नसल्याची टीका त्यांनी आरबीआयचे नाव न घेता केली. धोरण ठरवणाऱ्यांनी महागाईचा अंदाज लावताना चुकी केली असल्याचेही ते म्हणाले.
 
औद्योगिक उत्पादनात घट,  आयआयपी १.७ टक्क्यांवर  
 
खनन आणि उत्पादन क्षेत्राच्या कमजोर प्रदर्शनामुळे औद्योगिक उत्पादनाची गती कमी झाली आहे. मे महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) कमी होऊन १.७ टक्के नोंदवण्यात आला. गेल्या वर्षी मे महिन्यात हा आकडा ८ टक्के होता. गुंतवणुकीसाठी प्रमुख इंडिकेटर मानल्या जाणाऱ्या कॅपिटल गुड्स क्षेत्रात ३.९ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. गेल्या वर्षी या समान महिन्यात या क्षेत्रात १३.९ टक्क्यांच्या गतीने वाढ झाली होती. खनन क्षेत्रातील उत्पादनातही ०.९ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात ५.७ टक्के वाढ नोंदवण्यात आली.
 
असा कमी झाला किरकोळ महागाई दर  
जानेवारी - ३.१७ %  
फेब्रुवारी - ३.६५ %  
मार्च - ३.८९ %  
एप्रिल - २.९९ %  
मे - २.१८ %  
जून - १.५४ %
 
आयआयपीत अशी झाली घसरण  
जानेवारी - ३.० %  
फेब्रुवारी  - १.९ %  
मार्च - ३.८ %  
एप्रिल - ३.१ %  
मे - १.७ %
 
आरबीआयवर दर कपातीचा दबाव
पतधोरण निश्चित करताना रिझर्व्ह बँक किरकोळ महागाई दराच्या आकडेवारीचा विचार करते. अशा परिस्थितीत महागाई दर विक्रमी पातळीवर घटल्यामुळे भारतीय औद्योगिक उत्पादनात घसरण नोंदवण्यात आल्यामुळे रिझर्व्ह बँकेवर दर कपातीचा दबाव वाढला आहे. उद्योग जगतानेही घडामोडींमध्ये तेजी आणण्यासाठी रेपो दर कपात करण्याची मागणी केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या एमपीसीची पुढील बैठक एक आणि दोन ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ६ आणि ७ जून रोजी झालेल्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने व्याजदरात बदल केला नव्हता. 
 
बातम्या आणखी आहेत...