नवी दिल्ली - ग्रामीण शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या लघुकथा संग्रहासाठी वर्ष २०१६ चा साहित्य अकादमी पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला.
कमानी सभागृहात साहित्य अकादमी २०१६ चा पुरस्कार सोहळा झाला. प्रख्यात शास्त्रज्ञ तसेच मराठी लेखक जयंत विष्णू नारळीकर, साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी, उपाध्यक्ष चंद्रशेखर कंबार, सचिव के. श्रीनिवास राव प्रमुख अतिथी होते. लोमटे यांना ‘आलोक’ या ‘लघुकथा’ साहित्यासाठी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून साहित्य अकादमी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. ‘आलोक’ मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनशैली मांडली आहे.
इंग्रजीसाठी मुंबईतील जेरी पिंटो यांना ‘एम एण्ड द बिग हूम’ या कादंबरीसाठी सन्मानित करण्यात आले. ‘अनेकएक’ या गुजराती काव्यसंग्रहासाठी कमल वोरा यांना, तर कोकणी भाषेतील ‘काळें भांगार’ कादंबरीसाठी एडविन जे.एफ.डिसोजा यांना पुरस्कृत करण्यात आले. देशातील २४ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या लेखकांनाही पुरस्कृत करण्यात आले. १ लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.