आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात महिलांचे वेतन कमी, पदाेन्नतीतही होतो लिंगभेद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील महिला कर्मचाऱ्यांच्या स्थितीवर टाकलेल्या प्रकाशझोतात पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत त्यांना कमी वेतनावर समाधान मानावे लागत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पदाेन्नतीतही पुरुषांनाच जास्त संधी उपलब्ध होत असल्याचे दिसले. लैंगिक समानता, लिंगभेदावरील मॉनस्टर वेतन निर्देशांकानुसार(एमएसआय) ही बाब समोर आली आहे.
 
उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांतील दरी रुंदावली आहे. या विभागात पुरुष कर्मचाऱ्याला सरासरी ताशी ३४५.८० रुपये वेतन मिळत असले तर महिला कर्मचाऱ्यास ते २५९.८ रुपये मिळते. मॉनस्टर इंडियाने “भारतीय उद्योग जगतातील महिला’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या अहवालात, भारतामध्ये अद्यापही लैंगिक समानता हा चिंतेचा विषय असल्याचे मत ६८. ५ % महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. यात सुधारणा होण्यासाठी व्यवस्थापनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
 
समान वेतन आणि सर्वसमावेशक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न झाले तरी पुरुषांना पदोन्नतीच्या संधी मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे ६२.४ टक्के महिलांना वाटते. पदोन्नती मिळताना अन्य घटकांशिवाय कर्मचारी स्त्री की पुरुष याचाही फरक पडतो,असे मत समोर आले. मॉनस्टर इंडियाने घेतलेल्या सर्वेक्षणात २००० महिला कर्मचाऱ्यांनी मते नोंदविली. लैंगिक समानतेला प्राधान्य देण्यात येत असले तरी व्यवस्थापन मात्र त्यानुरूप पुढाकार घेत नाही. त्यामुळे परिस्थिती बदलत नाही.
 
मुलाचे पालनपोषण मुख्य आव्हान
महिला कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याच्या कारणांपैकी प्रसूती आणि बाळाची देखभाल हे प्रमुख कारण आहे. मुलाची योग्य पालनपोषण हे महिला कर्मचाऱ्यांपुढील मुख्य आव्हान असल्याचे १३.१ टक्के महिलांना वाटते. अशा स्थितीत महिला कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची संधी किंवा कामाच्या ठिकाणी तसे वातावरण निर्माण केले जाऊ शकते.
 
उत्पादन क्षेत्रात वेतनातील तफावत २९.९ % 
 असे असले तरी २०१५ ते २०१६ दरम्यान स्त्री-पुरुष कर्मचाऱ्याच्या वेतनातील तफावत २ टक्क्यांनी कमी होत २७.२ टक्के झाल्याचे एमएसआयच्या अहवालात समोर आले आहे. उत्पादन क्षेत्रात स्त्री-पुरुष कर्मचाऱ्याच्या वेतनातील सरासरी तफावत २९.९ टक्के तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात २५.८ टक्के आहे. बीएफएसआय क्षेत्रात वेतनातील सरासरी फरक २१.५ टक्के आहे. शिक्षण आणि संशोधनात क्षेत्रातील हे अंतर १४.७ टक्के आहे.
 
वेतन फरक कंपन्यांपुढील आव्हान
- “भारतीय उद्योग जगतात कार्यरत महिला व पुरुष कर्मचाऱ्याच्या वेतनातील सरासरी तफावत २५ टक्के आहे. वेतनातील मूलभूत फरक हा कंपन्यांसमोरील सध्याचे आव्हान आहे’
- संजय मोदी, व्यवस्थापकीय संचालक, एपॅक अँड मिडल-इस्ट, मॉनस्टर डॉट कॉम
 
बातम्या आणखी आहेत...