आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या इस्रायल दौऱ्यात अनेक मोठे संरक्षण करार शक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान अनेक संरक्षण करार होण्याची शक्यता आहे. मोदी जुलैत इस्रायलला जातील. भारताचे पंतप्रधान प्रथमच इस्रायल दौऱ्यावर जात आहेत. भारतातील इस्रायलचे राजदूत डॅनियल कारमॉन यांनी रविवारी या दौऱ्याची माहिती दिली. 
 
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भारत-इस्रायल संबंधांत आणखी ‘स्पष्टता’ आली, असे प्रशंसोद्गार काढून कारमॉन म्हणाले की, इस्रायल आणि अरब देशांसोबत संबंध निर्माण करताना ‘कोणत्याही एकामुळे दुसऱ्याचे नुकसान’ न होऊ देण्याच्या भारताच्या धोरणामुळे भक्कम संदेश मिळाला आहे. आमचा देश या बदलाचा आदरच करतो. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात संरक्षण, सुरक्षा, कृषी, शिक्षण आणि संस्कृतीसह व्यापक क्षेत्रात विस्तारलेल्या रणनीती संबंधात आणखी सहकार्य करण्यावरही भर दिला जाईल. या दौऱ्यात भारतीय नौदलासाठी हवाई संरक्षण उपकरणांच्या खरेदीसह अनेक मोठे संरक्षण करार होऊ शकतात. हा एक मोठा आणि महत्त्वाचा दौरा असेल, त्यात विविध क्षेत्रांत दोन्ही देशांदरम्यान असलेले सहकार्य आणखी भक्कम करण्यात येईल. भारत आणि इस्रायल यांच्या कूटनीतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हा दौरा होत आहे. विशिष्ट संरक्षण करारांबाबत विचारले असता राजदूत कर्मन म्हणाले की, दोन्ही देशांतील संबंध खरेदी आणि विक्री यापेक्षा खूप पुढे गेले आहेत. आता दोन्ही देश संयुक्त संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करत आहेत. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी अब्जावधी डॉलरच्या दोन खरेदी करारांना अंतिम रूप दिले जाऊ शकते, असे मत संरक्षण संबंधांतील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
  
भारताच्या धोरणामुळे मिळाला भक्कम संदेश 
भारत पडद्यामागील सर्वात मोठा खरेदीदार 
भारत इस्रायलकडून लष्करी साहित्याची खरेदी करणारा सर्वात मोठा देश आहे. इस्रायलने गेल्या काही वर्षांत भारताला विविध शस्त्रास्त्र यंत्रणा, क्षेपणास्त्रे आणि मानवरहित विमानांचा पुरवठा करत आहे, पण ही खरेदी-विक्री मूलत: पडद्याआड केली जाते.

१७,००० कोटी रुपयांच्या कराराला मंजुरी
फेब्रुवारीत भारताने इस्रायलसोबत १७,००० कोटी रुपयांच्या एका कराराला मंजुरी दिली होती. त्यानुसार संयुक्तपणे जमिनीवरून हवेत मारा करू शकणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करायचे आहे. या करारावर मोदींच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी होऊ शकते.
 
हे करार होण्याची शक्यता 
- नौदलासाठी बराक-८ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणेची खरेदी.
- भारतीय नौदलासाठी स्पाइट तोफभेदी क्षेपणास्त्रांची खरेदी.
बातम्या आणखी आहेत...