आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरसेल-मॅक्सिस करार; मारन बंधू निर्दोष मुक्त, अडीच वर्षांपासून सुरू होते प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीच्या एका विशेष न्यायालयाने एअरसेल-मॅक्सिस करार प्रकरणात माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन, त्यांचे भाऊ कलानिधी मारन आणि इतरांची ठोस पुरावे न मिळाल्याने निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला.

तत्कालीन दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांनी, चेन्नईतील टेलिकॉम प्रमोटर सी. शिवशंकरन यांच्यावर २००६ मध्ये एअरसेलमधील हिस्सा मॅक्सिस ग्रुप या मलेशियन कंपनीला विकण्यासाठी बाध्य केले होते, त्या बदल्यात त्यांना मॅक्सिस कंपनीकडून ७४२.५८ कोटी रुपयांचा फायदा झाला, असा दावा विशेष सरकारी वकील आनंद ग्रोव्हर यांनी केला होता. मात्र, मारन यांनी या आरोपांचे स्पष्ट शब्दांत खंडन केले होते. दयानिधी मारन यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते की, एअरसेल-मॅक्सिस यांच्यादरम्यान ऑक्टोबर २००५ मध्येच करार झाला होता. त्यामुळे वर्ष २००६ मध्ये हिस्सेदारी विकण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपच चुकीचा आहे. 

न्यायालयाच्या गुरुवारच्या निकालाचा टी. आनंद कृष्णन, राल्फ मार्शल यांच्यावर कोणताही परिणाम पडणार नाही. न्यायालयाने त्यांची सुनावणी या प्रकरणातून वेगळी केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आपल्या आरोपपत्रात टी. आनंद कृष्णन, मलेशियातील नागरिक राल्फ मार्शल, मलेशियन कंपनी अॅस्ट्रो ऑल एशिया नेटवर्क, मॅक्सिस कम्युनिकेशन, सन डायरेक्ट टीव्ही प्रा. लि., साऊथ आशिया एफएमसह आठ जणांच्या विरोधात गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचाराच्या कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले होते. दुसरीकडे, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मारन बंधू, कलानिधी यांची पत्नी कावेरी, साऊथ आशिया एफ. एम. लि.चे महासंचालक के. षण्मुगम आणि सन डायरेक्ट टीव्ही प्रा. लि. ला या प्रकरणात आरोपी बनवले होते.

अडीच वर्षांपासून सुरू होते प्रकरण 
सीबीआयने २९ ऑगस्ट २०१४ रोजी दयानिधी मारन, त्यांचे भाऊ कलानिधी मारन, मॅक्सिसचे मालक टी. आनंद कृष्णन, मॅक्सिस ग्रुपचे वरिष्ठ कार्यकारी राल्फ मार्शल आणि सन डायरेक्टसह ८ जणांच्या विरोधात आरोपपत्र ठेवले होते. सीबीआयचा आरोप होता की, मॅक्सिसची मालकी टी. आनंद या मलेशियन व्यावसायिकाकडे आहे. मॅक्सिसने २००६ मध्ये एअरसेलचा ७४ टक्के हिस्सा खरेदी केला होता.
बातम्या आणखी आहेत...