आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ट्रिपल तलाक’चा दुरुपयोग; प्रथा त्वरित बंद करणे गरजेचे, महिला आयोग अध्यक्षांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘ट्रिपल तलाक’च्या प्रथेचा सर्वाधिक दुरुपयोग होतो. ती तत्काळ बंद करून मुस्लिम महिलांच्या हक्काचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी गुरुवारी व्यक्त केले.

त्या म्हणाल्या की, ट्रिपल तलाक हा राजकीय मुद्दा नाही. हा मुस्लिम महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न आहे. तो समान नागरिक कायद्याशी जोडला जाऊ नये. अनेक मुस्लिम देशांतही त्यावर बंदी आहे. अनेक मुस्लिम महिलांना या प्रथेमुळे असहाय स्थितीत पती आणि सासरच्या मंडळीचे अत्याचार सहन करावे लागतात. त्यामुळे ही प्रथा त्वरित बंद करणे गरजेचे आहे.

दुसरीकडे, कायदामंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, समान नागरिक संहितेमागे सरकारचा कुठलाही छुपा कार्यक्रम नाही. आम्ही मौलिक अधिकाराअंतर्गत मिळालेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा आदर करतो. पण कोणत्याही धर्माची प्रत्येक अयोग्य आणि भेदभाव करणारी प्रथा आस्थेशी संबंधित होऊ शकत नाही.

कायदा आयोगाचे निर्देश
समान नागरी संहितेबाबत राज्यांना पाठवलेल्या प्रश्नावलीवर लोकांनी प्रतिक्रिया नोंदवावी यासाठी कायदा आयोगाने सर्व मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले आहेत. प्रश्नावलीवर जास्तीत जास्त लोकांचे मत नोंदवून घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल.

मुस्लिम बुद्धिवंतही ट्रिपल तलाकच्या विरुद्ध
इतिहासकार प्रा. इरफान हबीब, अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाचे सरचिटणीस प्रा. अली जावेद, रंगकर्मी शम्शुल इस्लाम, कवी गौहर रजा, प्रा. आयेशा किदवई, सामाजिक कार्यकर्त्या शबनम हाशमीसह सुमारे शंभर बुद्धिवंतांनीही ट्रिपल तलाकला विरोध केला आहे. त्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, आम्ही ट्रिपल तलाकला विरोध आणि महिलांच्या स्वातंत्र्याचे समर्थन करतो. ही प्रथा संपावी. त्यांनी समान नागरी संहितेचाही विरोध केला.
बातम्या आणखी आहेत...