आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींकडे पाकबाबत सर्वंकष धोरणच नाही, राजनबाबत दुहेरी डावपेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाकिस्तानबाबत सर्वंकष धोरणच नाही, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. मुत्सद्देगिरीत गांभीर्य आवश्यक असते, नाट्यमयता नव्हे. सरकारच्या परराष्ट्र धोरणात सुसंगती, स्पष्टपणा आणि सातत्य नाही, अशी टिप्पणीही विरोधकांनी केली आहे.

पाकिस्तानसोबत भारताला शांततेचेच संबंध हवे आहेत, पण लष्करी दलांनाही त्यांना हव्या त्या भाषेत प्रत्युत्तर देण्याचे स्वातंत्र्यही आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले होते. त्यावर काँग्रेस आणि माकपनेही टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले की, पाकिस्तानशी चर्चा करण्यास कोणाचाही विरोध नाही, पण त्याबाबत विरोधकांना विश्वासात घेतले जात नाही. मुत्सद्देगिरीत नाट्यमयता नव्हे तर गांभीर्य आवश्यक असते.

माकपच्या नेत्या वृंदा कारत यांनीही केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारचे पाकिस्तानबाबत सर्वंकष धोरणच नाही. पाकिस्तान भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना बळ देत आहे यात काहीच शंका नाही, पण त्याला तोंड देण्यासाठी मुत्सद्देगिरीद्वारे गांभीर्यपूर्वक पुढाकार घेण्याऐवजी दिखाऊ धोरण अवलंबले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवाझ शरीफ यांना वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी पाकिस्तानला गेले होते.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबत दुहेरी डावपेच अवलंबले जात आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते पी. एल. पुनिया यांनी केला. ते म्हणाले की, एकीकडे सरकार त्यांच्या कामाची स्तुती करते, तर दुसरीकडे सुब्रमण्यम स्वामी यांचे म्हणणे मान्य करून राजन यांना निरोप दिला जात आहे. सध्या आपल्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य हवे आहे. त्यामुळे राजन यांची आवश्यकता आहे.
बातम्या आणखी आहेत...