आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला शांतताच हवी, चिथावल्यास ताकदही दाखवू, नव्या लष्करप्रमुखांना गार्ड ऑफ ऑनर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सीमेवर शांतता नांदावी अशी देश आणि लष्कराचीही इच्छा आहे, पण चिथावल्यास आम्ही बळाचा वापर करण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा भारताचे नवे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी रविवारी दिला. लष्करप्रमुखपदाच्या स्पर्धेत त्यांच्या मागे पडलेले ज्येष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी आणि लेफ्टनंट जनरल पी. एम. हारिज यांनी आपापल्या पदांवर कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
पदभार स्वीकारल्यानंतर २७ वे लष्करप्रमुख असलेले जनरल रावत यांना रविवारी साऊथ ब्लॉकमध्ये गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्या वेळी पाकिस्तानचे नाव न घेता जनरल रावत म्हणाले की, सीमेवर शांतता नांदावी अशी आमचा देश आणि लष्कराची इच्छा आहे. पण त्याचा अर्थ आम्ही कमकुवत आहोत असा नाही. पण आवश्यकता भासली तर आम्ही ताकदीचा वापर करण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत. 
 
लष्करातील सर्व सैनिकांना संदेश देताना रावत म्हणाले की, ‘प्रत्येक सैनिक मग तो कोणतीही तुकडी अथवा सेवेतील असो, तो महत्त्वाचा आहे. कारण देशाचे लष्कर कार्यक्षम आणि भक्कम राहण्यात त्याचे महत्त्वाचे योगदान आहे. शहीद सैनिकांचे कुटुंबीय, वीरपत्नी आणि युद्धात अपंग झालेल्या सैनिकांची काळजी घेणे हेही लष्कराचे परमकर्तव्य आहे.’ 

जनरल रावत हे पायदळातील असल्यानेच लष्करप्रमुखपदाची निवड करताना त्यांना प्राधान्य देण्यात आले आणि लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी हे आर्मर्ड कॉर्प्सचे असल्याने त्यांची निवड झाली नाही, अशी भावना लष्करात झाली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्यांची ही टिप्पणी महत्त्वाची मानली जात आहे. लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी आणि लेफ्टनंट जनरल हारिज यांचा मी सन्मानच करतो. त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे आणि भविष्यातही लष्कराची ताकद आणि एकता कायम राखण्यासाठी ते पुढेही करत राहतील याची मला खात्री आहे, असा उल्लेखही रावत यांनी केला.  

सरकारने लष्कराला दिलेले काम आणि लष्कराची भूमिका याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे, असे स्पष्ट करताना रावत म्हणाले की, सीमेवर सुरक्षितता कायम ठेवणे, अंतर्गत सुरक्षा राखण्यास सरकारला मदत करणे आणि एखादी आपत्ती आल्यास मदतीला धावणे हेच लष्कराचे काम आहे.  

पूंछमध्ये पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार 
जम्मू
- वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानी लष्कराने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. सकाळी ९ वाजेच्या सुमाराला पूंछमधील शाहपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने एलओसीवर जोरदार गोळीबार केला. भारतीय लष्करानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. 

भारत-बांगलादेश सीमेवर स्मार्ट सेन्सर-लेझरच्या भिंती  
कोलकाता
- भारत-बांगलादेशच्या सीमेवर लवकरच स्मार्ट सेन्सर आणि लेझरच्या भिंती सुरक्षा करतील. जेथे सुरक्षा दलांची तैनाती शक्य नाही अशा ठिकाणी निगराणी आणि सुरक्षेसाठी त्या उपयुक्त ठरतील. दुर्गम भागातून होणारी घुसखोरी या तंत्रज्ञानाने रोखली जाईल. बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही व्यवस्था विशेषत्वाने पोरस नदीच्या आसपासच्या भागात केली जाईल. तेथे कुंपण घालणे शक्य नाही. पुढील वर्षीपर्यंत ही योजना पूर्ण होईल. पुढील काही महिन्यांत तिचा पथदर्शी प्रकल्पही सुरू होईल. बीएसएफचे महासंचालक के. के. शर्मा आणि इतर अधिकाऱ्यांनी अलीकडेच या भागाचा दौरा केला होता.
बातम्या आणखी आहेत...