आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे खासदाराच्या वक्तव्यावरून संसदेत गोंधळ; दाक्षिणात्य भारतीय आहेत की नाही? खरगेंचा संतप्त सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे माजी खासदार तरुण विजय यांनी दक्षिण भारतीयांवर केलेल्या कथित वर्णद्वेषी टिप्पणीवरून लोकसभेत सोमवारी प्रचंड गोंधळ उडाला. विरोधकांनी त्यांच्यावर देशाचे तुकडे करण्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केलेल्या खुलाशानंतरही विरोधक शांत झाले नाहीत. गोंधळ सुरू राहिल्याने लोकसभेची कारवाई तीन वेळा तहकूब करावी लागली. दक्षिण भारतीय काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभागृहास सवाल विचारला : आम्ही भारतीय नागरिक आहोत की  नाही? याच्या उत्तरात संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी म्हटले : खारगेजी, असा भेदभाव निर्माण करु नका. भारत एकसंघ आहे.  

सकाळी ११ वाजता सभागृहाच्या कामकाजास प्रारंभ झाला तेव्हा मल्लिकार्जून खारगे  यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शून्यकाळात हा विषय मांडण्याची सूचना केली. त्यावर खरगे म्हणाले, हा मुद्दा येथे मांडता येत नाही तर, कोठे मांडणार? विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने लोकसभेचे कामकाज १० मिनिटांकरिता स्थगित करण्यात आले. शून्यकाळातही गाेंधळ सुरूच राहिल्याने लाेकसभेचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले. 

राज्यसभेत विरोधकांचा आरोप : सीबीआय, ईडीचा राजकीय वापर : राज्यसभेत सोमवारी काँग्रेसने केंद्र सरकार बिगर भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सीबीआय आणि ईडीचा वापर सुरू  असल्याचा आरोप केला. विरोधकांनी या मुद्द्यावर गोंधळ सुरू करताच सभागृहाचे कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आले. 

विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले : बिगर भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सीबीआय आणि ईडीचा वापर करण्यात येत आहे. काँग्रेसच्या आनंद शर्मा यांनी या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. भाजपच्या राज्यात आणि बिगर भाजपशासित राज्यात दुजाभाव करता येणार नाही. यावर सर्व काँग्रेस सदस्य उठून उभे राहिले. त्यांनी केंद्र सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या. उपसभापती पी. जे. कुरियन यांनी दोन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित केले. 
 
दरम्यान, शीख दंगली प्रकरणी काँग्रेसने कधी माफी मागितली नाही, असे अकाली दलाच्या खासदारांनी म्हणताच, पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांत घोषणायुद्ध सुरू झाले.

ही टिप्पणी भाजपची मानसिकता दर्शवते : खरगे  
खरगे म्हणाले : अशी टिप्पणी करणारे माजी खासदार हे साधे व्यक्तिमत्व नाही. त्यांनी भाजपच्या तत्त्वज्ञानावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. यामुळे देशाची एकता आणि अखंडतेला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा. 

कोणीही असो, भेदभाव सहन करणार नाही : राजनाथ सिंह  
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले : भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. येथे जातपात आणि रंगावरून भेदभाव करता येणार नाही. मग ते िकतीही मोठे व्यक्तिमत्त्व का असेना, त्यास भेदभाव करण्याची परवानगी नाही. तरुण विजय यांचा बचाव करताना ते म्हणाले : माजी खासदारांनी आधीच माफी मागितली आहे. आता हा मुद्दा उपस्थित करणे औचित्याला धरून नाही.  
बातम्या आणखी आहेत...