आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अच्छे दिन भलतेच महागडे, संसदेत विरोधकांनी उडवली घोषणेची खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी महागाईच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारला घेरले. लोकसभेचे कामकाज रोखून धरत राज्यसभेत उत्तराची मागणी केली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अनेक तर्क दिले. महागाई हा मागील सरकारने दिलेला वारसा आहे, काही वस्तूंचे भाव वाढले आहेत, पण त्याला महागाई असे म्हणता येणार नाही. भाडेवाढ केली नसती तर रेल्वेचे चाक रुतलेअसते, अशा शब्दांत भाडेवाढीचे समर्थन केले. विरोधकांनी भाजपच्या ‘अच्छे दिन’च्या दाव्याची खिल्ली उडवत राज्यसभेत सभात्याग केला. लोकसभेत विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी लावून धरल्याने प्रचंड गदारोळ झाला. अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

काँग्रेसने घेरले
काँग्रेसने महागाईवरून मोदी सरकारला संसदेत तर घेरलेच, शिवाय रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. लोकसभेत राहुल गांधीही सरकारच्या विरोधात हौद्यात उतरले. त्यावर काँग्रेसच्या पराभवामुळे राहुल यांना सक्रिय बनवले, अशी टिप्पणी भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांनी केली. दिल्लीत प्रदेश काँग्रेसने धरणे आंदोलन केले.

राष्ट्रवादीने साथ सोडली
अनेक पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सभात्याग केला, पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, डी. पी. त्रिपाठी व माजिद मेमन सभागृहात बसून होते.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
- विरोधी नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन भाजप सत्तारूढ झाला, पण गरिबांचे ‘बुरे दिन’ सुरू झाले आहेत. हा जनतेचा विश्वासघात आहे.
- अरुण जेटली म्हणाले की, आता फक्त 2 महिने झाले आहेत. आणखी काही दिवस थांबा. मागील यूपीए सरकारने कठोर निर्णय घेतले नाहीत, त्यामुळे अर्थव्यवस्था गर्तेत रुतली.
- काँग्रेसचे प्रमोद तिवारी म्हणाले, महागाई बाहेरच्या कारणांमुळे नव्हे तर, सरकारने वाढवली आहे. रेल्वेभाडे, पेट्रोल, डिझेल तुम्हीच महाग केले आहे.
- अर्थमंत्री जेटली उत्तरले, ही सर्व यूपीएचीच करणी आहे. तुमच्या धोरणांमुळेच हे दिवस आले. तेव्हा धोरण चांगले ठेवले असते तर महागाई वाढली नसती.
आज दुपारी 12 वाजता रेल्वे बजेट
रेल्वेमंत्री सदानंद गौडा मंगळवारी संसदेत आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर करतील. त्यात रेल्वेचे उत्पन्न वाढवण्याच्या उपायांवर भर असेल. सेमी बुलेट, हाय स्पीड, डायमंड क्वाड्रिलॅटरल व आधुनिकीकरण प्रकल्पांसह नव्या गाड्यांचीही घोषणा होऊ शकते.
फोटो - अधिनेशनाच्या पहिल्याच दिवशी घोषणाबाजी करणारे विधेयक.