आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा गोंधळ! काँग्रेसचे सलग दुसऱ्या दिवशीही धरणे, लोकसभा अध्यक्षांच्या घरासमोर आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभेतून काँग्रेस खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी संसद भवन परिसरात आंदोलनाचे वातावरण आहे. सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसने संसद परिसरात धरणे आंदोलन सुरू ठेवले. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज बुधवारी पूर्णपणे ठप्प होते. लोकसभेत घोषणाबाजी व गोंधळाचे वातावरण होते, तर बाहेरही असाच माहोल होता.

काँग्रेसच्या २५ खासदारांना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सोमवारी ५ दिवसांसाठी निलंबित केले. अध्यक्षांच्या इशाऱ्यानंतरही हे सदस्य सभागृहात पोस्टर्स मिरवत होते. या निलंबनाच्या निषेधार्थ काँग्रेसने सलग दोन दिवस महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. या वेळी काँग्रेस सदस्यांनी काळ्या पट्ट्या वापरल्या. सरकारविरोधी घोषणाबाजी करून त्यांनी रोष व्यक्त केला. हे आंदोलन गुरुवारीही सुरू राहील, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले. या आंदोलनात सपा, जदयू, राजद, एनसीपी सदस्यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला. लोकसभेत कामकाज सुरू होण्यापूर्वी या सर्व पक्षांनी ‘लोकशाहीची हत्या थांबवा’ अशी घोषणाबाजी सुरू केली. निलंबन रद्द करा, अशी मागणी करत त्यांनी सभागृहातून वॉकआऊट केले. या वेळी तृणमूल सदस्य सभागृहात अनुपस्थितच होते. या राजकीय पक्षांनी मंगळवारीही कामकाजावर बहिष्कार टाकला होता. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली २०० कार्यकर्त्यांनी जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंह बरार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लोकसभा अध्यक्षांच्या घरासमोर निदर्शने केली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात बरार यांच्यासह काही कार्यकर्ते जखमी झाले. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सलग दुसऱ्या आठवड्यातही दोन्ही सभागृहांत कोंडी कायम
राज्यसभेत गोंधळ, कामकाज ठप्प

काँग्रेसने लोकसभेत आपल्या सदस्यांच्या निलंबनाला विरोध करत बुधवारी राज्यसभेत गोंधळ घातला. यामुळे दोन वेळेस स्थगन प्रस्ताव आल्यानंतर अखेर सभागृहाचे कामकाज गुरुवारपर्यंत स्थगित करावे लागले. सकाळी सदनाचे कामकाज सुरू होताच सभापती हमीद अन्सारी यांनी सदस्यांना मध्य प्रदेशमध्ये हरदाजवळील रेल्वे दुर्घटनेची माहिती दिली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू अपघाताची माहिती देण्यासाठी उभे राहिले. मात्र, काँग्रेस व विरोधी खासदारांनी गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे प्रभू यांना निवेदन करता आले नाही आणि कामकाज १२.०० वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. सभापती अन्सारी यांनी बारा वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र सभागृहातील वातावरण जैसे थे होते. यामुळे अन्सारी यांनी पहिल्यांदा दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

अँग्लो इंडियन सदस्य रिचर्ड यांना शपथ
लोकसभेत अँग्लो इंडियन समुदायाचे सदस्य प्रो. रिचर्ड हे यांनी बुधवारी सदस्यत्वाची शपथ घेतली. यांनी प्रश्न्नोत्तराचा तास सुरू होताच प्रो. रिचर्ड हे यांना शपथ देण्यात आली. राष्ट्रपतींनी २३ जुलै रोजी केरळच्या तलिचेरी येथील प्रो. हे आणि कोलकात्यातील जॉर्ज बेकर यांना लोकसभेत नामनिर्देशित सदस्य नियुक्त केले.

एकही दिवस कामकाज नाही
पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत एकही दिवस कामकाज होऊ शकले नाही. काँग्रेस ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचा राजीनामा मागत आहे. व्यापमं घोटाळ्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवला आहे. राजीनामा देईपर्यंत कामकाज होऊ न देण्याचा इशारा काँग्रेसने दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस, सप, जदयू, राजदचा काँग्रेसला पाठिंबा
धरणे आंदोलनात सप, जदयू, राजद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. संबंधित खासदारांनी लोकसभेचे कामकाज सुरू होताच लोकशाहीची हत्या बंद करा अशा घोषणा दिल्या. यानंतर कामकाजावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर करत सभात्याग केला. तृणमूल काँग्रेसचे सदस्य सभागृहात आले नाहीत. या सर्व पक्षांनी कामकाजावर बहिष्कार टाकला होता.