आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट मर्सेलवर भाजपचा आक्षेप; राहुल यांचा पलटवार; अभिनेता विजय टीकेचे लक्ष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी तामिळ चित्रपट “मर्सेल’वरून उफाळलेल्या वादावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे. राहुल गांधी म्हणाले, मोदींनी मर्सेल चित्रपटावर आक्षेप नोंदवून तामिळींचा आत्मसन्मान दुखावू नये, तर चिदंबरम यांनी म्हटले,  चित्रपट निर्मात्यांनी सरकारचे  गुणगौरव करणारे माहितीपट बनवावेत. त्यातच त्यांचे भले आहे. “मर्सेल’मधील काही संवाद जीएसटी व नोटाबंदीवर टीका करणारे आहेत. भारतीय जनता पक्ष हे संवाद वगळण्याची मागणी करत आहे.  
 
राहुल गांधी यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, मिस्टर मोदी, सिनेमा तामिळनाडूची संस्कृती व भाषेची  व्यक्त होणारी सखोल अभिव्यक्ती आहे. “मर्सेल’मध्ये हस्तक्षेप करून तामिळ प्रतिष्ठा “डिमॉनिटाइज’ करण्याचा प्रयत्न करू नका, तर चिदंबरम म्हणाले, भाजप मर्सेलमधील संवाद वगळण्याची मागणी करत आहे. कल्पना करा, आजच्या परिस्थितीत जर ‘पराशक्ती’सारखा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर काय घडले असते? एका अन्य टि्वटमध्ये त्यांनी लिहिले, चित्रपट निर्मात्यांसाठी नोटीस आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. लवकरच नवा कायदा अस्तित्वात येत असून  त्यानुसार तुम्ही केवळ सरकारचे गुणगान गाणारे माहितीपटच बनवले पाहिजेत. 
    
“पराशक्ती’ चित्रपटात १९५० च्या काळातील सामाजिक व आर्थिक दुरवस्थेचे चित्रण  दाखवण्यात आले अाहे. ब्राह्मण व हिंदूंच्या परंपरा व प्रथांच्या चित्रणामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. जीएसटी व नोटाबंदीवरील टीकांमुळे भारतीय जनता पक्षातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.    

अभिनेता विजय टीकेचे लक्ष्य   
चित्रपटात अभिनेता विजय याचा एक संवाद आहे.  तो म्हणतो, जीएसटीमुळे वस्तूंचे दर वाढले असून भारत कधीही सिंगापूरप्रमाणे प्रगती करू शकत नाही. केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन व  तामिळनाडू भाजप शाखेचे अध्यक्ष तामिळसाई सुंदरराजन यांनी या संवादावर आक्षेप घेतला आहे. चुकीचा संदेश जातो आहे, असे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...