आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेचा कचरा जाळल्याने ‘ताज’ काळवंडला, भारत-अमेरिकी संशोधन पथकाचा निष्कर्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जगातील आश्चर्यांपैकी एक अशी ओळख असलेल्या ताजमहालाच्या परिसरातच आग्रा महापालिका कचरा जाळला जात आहे. त्यामुळे ताजमहाल काळवंडला आहे, असा निष्कर्ष भारतीय-अमेरिकी संशोधन पथकाने काढला आहे.
मिनसोटा विद्यापीठातील अजय नागपुरे आणि जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील राज लाल यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने या संशोधनासाठी नव्या पद्धतींचा वापर केला आहे. ताजमहालाच्या परिसरात गोवऱ्या जाळल्याने आणि महापालिकेचा कचरा जाळल्याने होत असलेले वायुप्रदूषण यांचा तुलनात्मक अभ्यास या पथकाने केला आहे. महापालिकेचा कचरा जाळल्याने होत असलेले वायुप्रदूषण अधिक धोकादायक आहे, असा निष्कर्ष पथकाने काढला आहे.
कचरा जाळल्याने १५० मिलिग्रॅम प्रतिचौरसमीटर प्रतिवर्ष एवढा काजळीचा थर ताजमहालाच्या पृष्ठभागावर जमत आहे. त्या तुलनेत गोवऱ्या जाळल्याने १२ मिलिग्रॅम प्रतिचौरसमीटर प्रतिवर्ष एवढा काजळीचा थर जमा होतो. या दोन्ही प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे आढळले आहे.

विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे हवा प्रदूषित होत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेच शिवाय प्राचीन इमारती, बांधकामाच्या रंगावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे, अशी माहिती आयआयटी कानपूरचे सच्चिदा त्रिपाठी आणि मिन्नेसोटा विद्यापीठाच्या अनू रामस्वामी यांनी दिली.

प्रशासनाने उचलली पावले
हवेच्या प्रदूषणाचा ताजमहालावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून आग्रा येथील प्रशासनाने अलीकडेच पावले उचलली आहेत. त्यात ताजहालाच्या परिसरात वाहनांच्या प्रवेशावर बंदी, नवीन कारखाने उभारण्यास बंदी तसेच परिसरात गोवऱ्या जाळण्यावर बंदी या उपाययोजनांचा समावेश आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...