आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाच्या ‘दंडा’चे ओझे मोदी किती पेलणार? पायलट यांच्या तिखट कोपरखळ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या यशासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला श्रेय देत माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नागपूरचा दबाव असल्याचे म्हटले आहे. मोदी हा दबाव किती काळ सहन करतील हे सांगता येत नाही. मात्र, मोदींवर नियंत्रण ठेवण्यासाठी संघ किती मोठा ‘दंड’ वापरतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे, असे पायलट म्हणाले.

भाजपच्या काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणेबद्दल चिंता व्यक्त करत पायलट म्हणाले, संघाशी संबंधित जे लोक सरकारवर संघाचे नियंत्रण नसल्याचे सांगतात ते वस्तुस्थितीला धरून नाही. आम्ही कधीच भाजपमुक्त किंवा जनता दलमुक्त भारत अशी घोषणा केली नाही. कट्टर विचारसरणीचे लोक सरकार चालवत आहे. नागपूरचे (संघाचे मुख्यालय) सरकारवर नियंत्रण नाही, असे कोणी मला सांगत असेल तर ते वस्तुस्थितीला धरून नाही.

लोकांच्या स्वातंत्र्याची गळचेपी
विहिंप, संघ आणि बजरंग दलाकडून विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत. महिलांनी काय परिधान करावे व काय करू नये याबाबतची वक्तव्ये गोव्यातील मंत्र्यांकडून केली जातात. देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे, असा आरोप पायलट यांनी केला.

भाजपच्या यशात संघाचा वाटा
पंतप्रधान मोदी यांनी आपण केवळ राज्यघटनेचे पालन करत असल्याचे म्हटले आहे. याचा संदर्भ देत पायलट म्हणाले, मात्र नागपूरने दबाव टाकल्यास ते किती सहन करू शकतील याबद्दल साशंकता आहे. संघाची विशिष्ट ध्येय धोरणे आहेत. या निवडणुकीतील भाजपच्या विजयात त्यांचे यश नाकारले जाऊ शकत नाही.

मोठा जनादेश म्हणजे मनमानीचे परमिट नाही
मोदी यांनी आपल्या कामगिरीतून त्रिशतक ठोकल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अलीकडेच काढले होते. त्यावर पायलट म्हणाले, मोदी यांची पंतप्रधानपदाच्या उमेदवारीनंतर अडवाणींची प्रतिक्रिया कोणी विसरू शकत नाही. मोठा जनाधार म्हणजे लोकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही.

21 व्या शतकातील काँग्रेससाठी बदल
21 व्या शतकातील काँग्रेस आकाराला येण्यासाठी पक्षात लवकरच अपेक्षित बदल होतील, असे सचिन पायलट यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर राहुल गांधी यांच्या माथी फोडण्यास त्यांनी नकार दिला. याबरोबर ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्याबाबत पक्षांतर्गत चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

तुमच्या स्टॅम्पसाठी कायदा दुरुस्त करा
कंपनी कायद्यात दुरुस्ती करून नवा कायदा आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पायलट यांनी सरकारला या कायद्यावर स्वत: शिक्का मारायचा असेल तर त्यांनी त्यात अवश्य दुरुस्ती करावी, असे म्हटले आहे. सचिन पायलट यांच्या पुढाकारातून नवा कंपनी अधिनियम 2013 मंजूर झाला.