आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात भाषा सुरक्षा मंच लढणार, पण मी लढणार नाही : वेलिंगकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गोव्यात होऊ घातलेली आगामी विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय भारतीय भाषा सुरक्षा मंचचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांनी बुधवारी घेतला. त्यासोबतच पक्षाचा चेहरा ऑक्टोबरअखेर निश्चित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. गोव्यात ४० पैकी ३५ विधानसभा मतदारसंघामध्ये लढण्याची तयारी भाषा सुरक्षाने केली असून, समविचारी पक्षांच्या संभाव्य महाआघाडीमध्ये जागांवरून तडजोड करण्याची तयारी वेलिंगकर यांनी दर्शवली.

गोव्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या चारही पक्षांपासून अंतर राखून आपला पक्ष निवडणूक लढवणार असल्याचेही वेलिंगकर यांनी स्पष्ट केले. शुक्रवार, १६ सप्टेंबर रोजी भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या राजकीय शाखेचे संयोजक उदय केंबरे बैठक होणार असून, त्यात पक्षाचे नाव आणि अन्य तपशील निश्चित होईल, अशी माहिती वेलिंगकर यांनी दिली.
भाषा सुरक्षा मंचसोबत हातमिळवणी करण्यासाठी सध्या भाजपशी असलेली युती तोडण्याचा निर्णय घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिल्याचे सांगितले. या निवडणुकीत भाषा सुरक्षाने ३५ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, शिवसेना, गोवा प्रजा पक्ष आणि बहुजन महासंघ अशा समविचारी पक्षांची महाआघाडी झाल्यास जागा वाटपावरून तडजोड होईल. गोव्यात भाजपविरुद्ध लढण्यासाठी उतरलेले वलिंगकर यांचे नेतृत्व शिवसेनेने मान्य केले आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अनुदान बंद करावे, तसेच प्राथमिक शिक्षणाचे माध्यम प्रादेशिक भाषा करावे, या मागणीकडे राज्यातील सत्ताधारी भाजपने दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभागाचे तत्कालीन प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी भाजपवर टीका केली. त्यामुळे त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
सुभाष वेलिंगकरांच्या संस्थेला पाठिंबा
पणजी - वादग्रस्त मुद्द्यावरून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य कोणत्याही पक्षासोबत संघर्ष करणार नाही. मात्र, संभाष वेलिंगकर यांच्या भारतीय भाषा सुरक्षा मंचाला आमचा पाठिंबा राहणार असल्याचे संघाच्या गोवा विभागाचे नवनियुक्त प्रमुख लक्ष्मण बेहरे यांनी स्पष्ट केले. गोव्यात मार्च २०१७ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाषा सुरक्षा मंचची १६ सप्टेंबरला बैठक होत आहे. त्यामुळे बेहरे यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...