नवी दिल्ली - मनी लॉंडरिंगच्या १० वर्षे जुन्या प्रकरणात अटकेत असलेला काश्मिरातील फुटीरतावादी नेता शब्बीर शाहच्या काेठडीत येथील न्यायालयाने सहा दिवसांची वाढ केली. गुरुवारी त्याच्या सुनावणीदरम्यान पटियाला हाऊस न्यायालयात नाट्यमय स्थिती निर्माण झाली हाेती. या वेळी ईडीच्या वकिलाने त्याला ‘भारतमाता की जय’ बाेलून अापली देशभक्ती सिद्ध करण्यास सांगितले. यावरून न्यायाधीशांनी त्यास ‘हे न्यायालय अाहे, टीव्ही स्टुडिअाे नाही’ असे म्हणत फटकारले.
विदेशातून मिळणाऱ्या पैशांतून शब्बीर हा देशाला बरबाद करत असल्याचे सांगून ईडीचे वकील राजेश अवस्थी यांनी अतिरिक्त न्यायदंडाधिकारी सिद्धार्थ शर्मा यांना शब्बीरच्या काेठडीत वाढ करण्याची मागणी केली. या वेळी अॅड.अवस्थी यांनी जाेशात शब्बीरला ‘भारतमाता की जय’ बाेलून अापली देशभक्ती सिद्ध करण्यास सांगितले. त्यावर न्यायदंडाधिकारी शर्मा यांनी ‘हे न्यायालय अाहे, टीव्ही स्टुडिअाे नाही’ असे सांगून त्यांना फटकारले. तसेच मुद्देसूद बाेलण्यास सांगितले. त्यावर अॅड.अवस्थी यांनी दगडफेकीसह देशविराेधी कारवायांसाठी विदेशातून मिळणाऱ्या पैशांचा वापर केला जात अाहे. याशिवाय शब्बीर शाहच्या काेट्यवधी रुपये संपत्तीचे स्राेत समाेर येणे गरजेचे असून, २५ जुलैला अटक केल्यानंतर शब्बीर तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगितले. त्यावर शब्बीरच्या वकिलाने शब्बीरवर विविध प्रकारे दबाव टाकण्यात येत असल्याचा अाराेप केला.