आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्फर्म तिकिटांसाठी लवकरच नवी प्रणाली, रेल्वे प्रवास होणार सुखद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू नवीन वर्षात प्रवाशांना खुशखबर देण्याच्या तयारीत अाहेत. प्रत्येक प्रवाशाला रेल्वेचे कन्फर्म तिकीट कसे मिळेल यासाठी त्यांची यंत्रणा कामाला लागली आहे. गेल्याच आठवड्यात प्रभूंनी प्रवाशांना आवडीचे जेवण रेल्वेत मिळावे म्हणून देशातील ४५ स्थानकांची निवड केली आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

देशभरात लांबच्या ठिकाणी जायचे असल्यास लोक रेल्वेनेच प्रवास करतात; परंतु तिकीट काढायच्या वेळेस ते कन्फर्म मिळेल याची खात्री नसते. बहुतेकांना प्रतीक्षेतील तिकीट घ्यावे लागते आणि प्रवास करायच्या दिवशी तिकीट कन्फर्म होणार की नाही याची त्यांच्या मनात घालमेल असते. तिकीट कन्फर्म झाले की लोक सुटकेचा नि:श्वास टाकतात. मात्र, अनेकांना तिकीट प्रतीक्षा यादीतच असल्याने रेल्वेस्थानकाहून परतावे लागते. प्रभू मंत्री झाल्यानंतर ते देशात ज्या-ज्या ठिकाणी गेलेत तिथे त्यांना यासंदर्भात तक्रारी मिळाल्या. काही ठिकाणी दलालांकडून कन्फर्म तिकीट मिळत असल्याचे प्रभूंच्या निदर्शनास अाणून देण्यात आले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये व त्यांना कन्फर्म तिकीट मिळावे यासाठी प्रभू यांनी गेल्या सहा महिन्यांपासून यंत्रणा कामाला लावली आहे.

रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिम विकसित : प्रवासी जेव्हा तिकीट खिडकीवर जातात तेव्हा बुकिंग करणारा क्लर्क हा रेल्वेच्या आरक्षणाची स्थिती सांगतो, तिकीट कन्फर्म मिळत नसेल तर अन्य पर्याय सुचवतो. मात्र, लांब रांग असली तर कारकुनाच्याही काही मर्यादा असतात. अाता रेल्वे प्रशासन तिकीट आरक्षित करण्याच्या यंत्रणेतच बदल करत आहे. ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिम’ ही नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. तिकीट आरक्षित करताना आपणास जी तिकीट पाहिजे असले ती जर प्रतीक्षा यादीत येणार असेल तर ही सिस्टिम लगेच ज्या श्रेणीत कन्फर्म तिकीट उपलब्ध असेल ती श्रेणी स्क्रीनवर दाखवेल. संबंधित ट्रेनमधील सर्वच श्रेणीतील तिकिटे आरक्षित झाली असल्यास त्याच स्थानकावरून जाणाऱ्या अन्य उपलब्ध ट्रेनचा पर्याय ही सिस्टिम प्रवाशांना सुचवणार आहे आणि त्या ट्रेनची अारक्षण स्थितीही पडद्यावर येईल व त्याच क्षणी तिकीट आरक्षित करता येईल.

रेल्वेचे सहायक महासंचालक अनिल सक्सेना यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले की, ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिम’मधील आरक्षणाच्या यंत्रणेत बदल करण्याला गती मिळाली आहे. बाराही महिने प्रवाशांचा लोंढा रेल्वेकडे असतो. रेल्वेच्या सुरक्षिततेवर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांना कन्फर्म तिकीट मिळणे देणे हे प्रशासनाचे कर्तव्य अाहे. नव्या यंत्रणेमुळे बहुतांश प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळेल आणि नवीन वर्षापासून त्यांचा प्रवास सुखाचा होईल.