आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबुल सुप्रियो यांच्या घरावर तृणमूल कार्यकर्त्यांचा हल्ला, पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको करून तोडफोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/कोलकाता- १७ हजार कोटी रुपयांच्या रोझ व्हॅली चिटफंड घोटाळा प्रकरणात खासदार सुदीप बंदोपाध्याय यांना अटक झाल्याने तृणमूल काँग्रेस पक्ष प्रचंड भडकला आहे. पक्षाच्या हिंसक निदर्शनांत भाजपलाच प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आले आहे. कोलकाता येथे केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या घरावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.
  
बाबुल सुप्रियो यांनी ट्विट करून सांगितले की, ‘तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी माझ्या अपार्टमेंटचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला. तेथे माझे आई-वडील राहतात. उत्तरपाडामध्ये भाजप नेते कृष्णा भट्टाचार्य यांच्या घरावरही हल्ला झाला. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कारवरही हल्ला झाला. तृणमूल कार्यकर्त्यांनी बंगालमध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर रास्तो रोको आंदोलन करून तोडफोड केली. बंगाल-झारखंड सीमेवरील आसनसोल येथील दुबुडीह चेक पोस्टवरही चार तास चक्का जाम होता.  

दिल्लीत तृणमूलच्या खासदारांचा मोर्चा
सुदीप यांच्या अटकेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा काढला. पण पोलिसांनी त्यांना मध्येच रोखत ताब्यात घेतले. पक्षाचे नेते सौगत रॉय यांनी सांगितले की, या मोर्चात ३६ खासदार सहभागी झाले होते. मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवतच राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.  

सुदीप यांच्या पत्नीची सीबीआयविरुद्ध तक्रार 
अटक करण्यात आलेले खासदार सुदीप बंदोपाध्याय यांच्या पत्नीने सीबीआयच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सीबीआयवर सुदीप यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला आहे. बिधाननगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली आहे. दुसरीकडे, भुवनेश्वरमध्ये सीबीआयच्या कार्यालयाबाहेर तृणमूलचे कार्यकर्ते ठाण मांडून होते. सुदीप आणि तपस पॉल यांना येथेच ठेवण्यात आले आहे. सुदीप यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी ते म्हणाले , नोटाबंदीच्या विरोधात संसदेत पक्षाने चांगली कामगिरी केली, माझी अटक ही त्याचीच निशाणी आहे.  
 
 
बातम्या आणखी आहेत...