आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी वकिलाती उडवण्याचे षड्यंत्र, पाकिस्तानी अधिकारी सिद्दिकी कारवायांचा मास्टरमाइंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील अमेरिकी व इस्रायली वकिलातीवर भीषण दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखला जात असून या कटात श्रीलंकेमधील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाचे काही अधिकारी गुंतल्याचे स्पष्ट होत आहे. भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) याचे धागेदोरे सापडले असून ही माहिती एनआयए श्रीलंका सरकारला कळवणार आहे.
आमिर झुबेर सिद्दिकी असे या पाकिस्तानी अधिकार्‍याचे नाव आहे. भारतीय गुप्तहेर संस्थेसाठी (आयबी) सिद्दिकी हे नाव नवे नाही. 2012-13 मध्ये सुरक्षा दलांनी तमीम अन्सारी याच्यावर पाळत ठेवून त्याला अटक केली होती. एक साधा व्यापारी असलेला अन्सारी बटाटे आणि कांद्यासह काही फळभाज्या श्रीलंकेत पुरवत होता. लंकेत हाजी नामक तामिळ भाषकाशी त्याची ओळख झाली. यादरम्यान अन्सारीचा धंदा बसला.
या काळात हाजीने त्याची ओळख सिद्दिकीशी करून दिली होती. तेव्हापासून आयबीची सिद्दिकीच्या कारनाम्यावर नजर होती. यानंतर सिद्दिकीने अन्सारीकडून नागापट्टीनम बंदर, काही नांगर टाकून उभ्या असलेल्या नौकांचे व्हिडिओ चित्रण करून घेतले. भारतातील परदेशी वकिलातींवर हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या एका मल्याळी व्यक्तीकडूनही सिद्दिकी याचे नाव आले होते. तामिळनाडू पोलिसांनी पकडलेल्या साकीर हुसेन याच्याकडूनही सिद्दिकीचे नाव पोलिसांना कळले होते. चेन्नईतील अमेरिकी व बंगळुरूतील इस्रायली वकिलातीची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी सिद्दिकीने आपल्याला नेमले होते, अशी कबुली हुसेनने पोलिसांना दिली होती.
एनआयएला असे सापडले हल्ल्याचे धागेदोरे
चेन्नईमधील अमेरिकी व इस्रायली वकिलातीची पाहणी करण्याच्या उद्देशाने भारतात घुसखोरी केल्याचा हुसेन याच्यावर आरोप होता. त्याच्याकडून या दोन्ही वकिलातींची छायाचित्रे व काही माहिती तामिळनाडू पोलिसांनी जप्त केली होती. ही छायाचित्रे नंतर पाकिस्तानात दहशतवाद्याच्या म्होरक्याकडे ई-मेलमार्फत पाठवण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर एनआयएने तपास हाती घेतला.
यामुळे संशयाला बळकटी
सायबर सिग्निचरनुसार भारतातील अमेरिकी व इस्रायली वकिलातींची छायाचित्रे कोलंबोतील पाकिस्तानी वकिलातीच्या परिसरातच डाऊनलोड करण्यात आली होती.
हुसेन व अन्सारी या दोन्ही आरोपींकडून मिळालेल्या माहितीमध्ये सिद्दिकी याच्या नावाचा संदर्भ.
श्रीलंकेतील मुस्लिम युवकांना भडकवण्याचा डाव
सूत्रांनुसार पाकिस्तानस्थित आयएसआयने आता श्रीलंकेतील मुस्लिम युवकांना भडकवून त्यांच्यामार्फतच भारत किंवा श्रीलंकेत हल्ले घडवून आणण्याचा डाव आखला आहे. यामुळे एक तर कोणत्याही गुन्हेगारीत नाव नसलेल्या व्यक्तीने दहशतवादी कारवाई घडवून आणली तर पोलिसांना नेहमीप्रमाणे पाकिस्तानी दहशतवादी गटांवर संशय घेण्यास जागा राहणार नाही, असा या कटामागे होरा आहे.
आमिर झुबेर मुख्य सूत्रधार
एनआयएने श्रीलंकेला देण्यासाठी जी माहिती एकत्रित केली आहे, त्यात लंकेतील पाकिस्तानी वकिलातीत व्हिसा विभागाचा प्रमुख अधिकारी आमिर झुबेर सिद्दिकी याचे नाव आहे. या कटाचा तोच मुख्य सूत्रधार असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येते. श्रीलंकेतील तरुणांमार्फतच हा हल्ला घडवून आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
करारानुसार माहिती देणार : भारत-श्रीलंकेदरम्यान परस्पर सहकार्याच्या दृष्टीने 2010 मध्ये करार झाला आहे. यानुसार एनआयए दहशतवादी हल्ल्याची माहिती लंकेच्या सरकारला पुरवेल.