नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा प्रदूषण नियंत्रणासाठी चारचाकी वाहनांचा सम-विषम प्रयोग केला जाणार आहे. या याेजनेचा पुढील टप्पा १५ ते ३० एप्रिलदरम्यान लागू केला जाईल, अशी घोषणा दिल्लीचे परिवहनमंत्री गोपाल राय यांनी सोमवारी केली. पहिला टप्पा १ जानेवारी ते १५ जानेवारीदरम्यान राबवण्यात आला होता.
राय यांनी सांगितले की, मागच्या वेळी शाळांच्या बसेसवरही हा नियम लागू होता. मात्र, या वेळी त्यांना सूट दिली आहे. पर्यावरण बससेवेतील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. सर्व बसेसमध्ये कमांडो तैनात असतील. मागच्या वेळी महिला आणि व्हीव्हीआयपींसह अनेक घटकांना या नियमातून सूट देण्यात आली होती. या वेळी या प्रकरणी सूट देण्याबाबतचा निर्णय ८ एप्रिलपर्यंत घेतला जाईल. मोबाइल वाहनांद्वारे प्रदूषणावर लक्ष ठेवले जाईल. दिल्लीसोबतच राष्ट्रीय स्तरावरही हवेतील प्रदूषण मोजले जाईल. राय यांनी सांगितले की, या वेळी नियंत्रणासाठी माजी सैनिकांचीही मदत घेतली जाईल. यासाठी राज्य सैनिक मंडळाकडून यादी मागवली आहे. १ एप्रिलपर्यंत ४०० जवानांची भरती केली जाईल. सिव्हिल डिफेन्सची भूमिका आधीप्रमाणेच असेल. सिव्हिल डिफेन्सचे ५ हजार स्वयंसेवक गांधीगिरीच्या माध्यमातून लोकांना नियम पाळण्याचे आवाहन करतील.