आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युआन स्वस्त झाल्याने भारतीय निर्यात महाग होणार : सीतारमण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चीनमधील चलन युआनची किंमत कमी होत असल्याने भारतीय निर्यात महागण्याची शक्यता असल्याचे मत वाणिज्यमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले. चीनमधून होणारी स्वस्त आयात थांबवण्यासाठी आयात शुल्कात वाढ करण्याबरोबरच इतर आवश्य निर्णय लवकरच घेण्यात येतील असे त्यांनी सांगितले. "व्यापार, विकास आणि संवर्धन परिषद'च्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

सीतारमण यांनी सांगितले की, २०१४-१५ मध्ये भारत आणि चीनदरम्यान ७२.३ अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. त्या वेळी भारताचा व्यापारातील तोटा ४९ अब्ज डॉलरचा होता. चीनचे चलन स्वस्त झाल्यानंतर या तोट्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चीनच्या केंद्रीय बँकेने त्यांचे चलन युआनची किंमत ०.५१ टक्क्यांनी कमी केली आहे. डॉलरच्या तुलनेत युआन आता सहा वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहे.

चीनमधून आयात होणाऱ्या प्रत्येक वस्तूबाबत विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आयात वस्तूंमुळे भारतीय उद्योगाचे नुकसान होत असेल तर त्या वस्तूंवर आयात शुल्क लावले जाईल. चीनमधून आयात होणाऱ्या पोलादावर आधीच शुल्क लावण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...