आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन गडकरींचे पंख छाटण्याचे प्रयत्न !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राज्यात भाजपचे एकमेव नेते म्हणून नितीन गडकरी यांचे नाव निर्विवादपणे येत असले तरी त्यांना खुजे कसे करता येईल यासाठी संघटना आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, मात्र गडकरींना मुख्य प्रवाहापासून लांब ठेवण्याचा भाजपने घाट घातला आहे. विकास पुरुष म्हणून ख्याती असलेले नितीन गडकरी यांच्याबाबत महाराष्ट्रभर जनमानसात आदर आहे. मनसेचे राज ठाकरेच नव्हे, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा गडकरी यांच्या कामाचे सातत्याने कौतुक करत असतात. युती सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी राज्यात केलेल्या कामाचे आजही गोडवे गायल्या जाते.

केंद्रात दळणवळण मंत्री झाल्यावर त्यांनी कामाचा धडाका सुरू केला. त्यांनी जाहीर केलेल्या रस्त्यांची कामे कोट्यवधी रुपयांची असतात त्यामुळे अन्य मंत्रालयांपेक्षा त्यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा वळतात. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी केलेली कामे अन्य नेत्यांची पोटदुखी झाली आणि त्यामुळेच त्यांना पूर्तीतील भ्रष्टाचाराच्या आरोपाला सामोरे जावे लागले होते. गडकरी यांचा देशाचे नेते म्हणून लौकिक होत असल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील अनेक भाजपच्या नेत्यांनी स्वत:ला गडकरीमय करून टाकले. देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष होऊ नये आणि सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा अध्यक्षपद मिळावे म्हणून त्यांनी पूर्ण शक्ती पणाला लावली होती. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी फडणवीसांचे नाव रेटून धरले त्यामुळे ते प्रदेशाध्यक्ष होऊ शकले. गडकरी जिथे जातात तिथे आपल्या व्यक्तिमत्त्वाने सर्वांना मागे टाकतात याची भाजप आणि केंद्राने दखल घेतली आहे.

गोपीनाथ मुंडे राज्याचे नेते असताना त्यांना गडकरींमुळे अनेकदा दुय्यम वागणूक मिळत गेली होती. त्याबाबत मुंडे यांनी अनेकदा तक्रारही केली होती. देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असले तरी गडकरी यांच्या भूमिकेमुळे त्यांना अडथडे निर्माण होतात अशा भावना फडणवीसांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे व्यक्त केल्याची चर्चा आहे. गडकरी शनिवार आणि रविवारी नागपूरमध्ये असतात त्या वेळी त्यांना भेटायला येणारे आणि पक्षात प्रवेश करणाऱ्यांची रीघ असते. गेल्या चार महनि्यांत ज्यांनी गडकरी वाड्यावर जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला त्यातील बहुतेकांना आपली विधानसभेची तिकीट पक्की झाली असा समज झालेला आहे. ते कार्यकर्ते तशी बाहेर चर्चा करत आहेत आणि प्रचारालाही लागले आहेत. मात्र, या बाबींची फडणवीस यांना जाणीव नाही. यामुळे गडकरी गट आणि फडणवीस गट अशी विभागणी झालेली आहे.
मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून फडणवीसांचे नाव येत असताना गडकरी समर्थक असलेले विनोद तावडे हे तोंड वर करताना दिसतात. जेव्हा राज्यातील भाजपचे शिष्टमंडळ विविध कामानिमित्त दिल्लीत येते तेव्हा फडणवीस, एकनाथ खडसे आदी नेते मागे असतात आणि तावडे हे प्रसारमाध्यमांना माहिती देऊन मोकळे झालेले असतात. नागपूरचे कॉँग्रेसचे नेते अनिस अहमद हे बड्या नेत्यांच्या कार्यक्रमाला गेले की, छायाचित्रकार दिसला की, आपण फोटोत कसे दिसू यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. विनोद तावडेंचे वागणेसुद्धा तसेच आहे. अमित शहा यांनी राज्यातील भाजप नेत्यांच्या भावना ऐकल्यानंतर राज्यामध्ये अन्य कोणी नेता तोंड खुपसणार नाही, अशी तंबी दिली आहे. हे गडकरींसाठी होते. शहांच्या या भूमिकेमुळे गडकरी गटातील नेते अस्वस्थ आहेत.
गंगेच्या जलवाहतुकीत आणले विघ्न
गंगेतून जलवाहतूक करण्यासाठी निघालेल्या गडकरींना मोदींनी अडवल्याचे दिसते. आधी नदी स्वच्छ होऊ द्या नंतर कोणते उपक्रम राबवायचे ते पाहू, अशी मोदींची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयानुसार केंद्राच्या आराखड्यानुसार गंगा स्वच्छ व्हायला २०० वर्षे लागणार आहेत. याचाच अर्थ गडकरींचे स्वप्न हे मोदी आणि शहा पूर्ण होऊ देणार नाहीत.