आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nitin Gadkari News In Marathi, Road Transport Minister, Advani, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लालकृष्ण अडवाणी राष्ट्रपती व्हायला हवेत, नितीन गडकरी यांनी व्यक्त केले मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राष्ट्रपती व्हायला हवेत. हे पद सर्वोच्च असून तेवढीच उंची लाभलेले अडवाणी त्यासाठी योग्य व्यक्तिमत्त्व ठरू शकतात, असे मत रस्ते-वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

टीव्ही कार्यक्रम ‘आप की अदालत’ मध्ये गडकरी यांनी आपले मत मांडले आहे. उपपंतप्रधान राहिलेल्या व्यक्तीला लोकसभेचे सभापती पद देणे योग्य ठरले नसते. म्हणूनच असा निर्णय घेण्यात आला नाही. वास्तविक अडवाणी हे राष्ट्रपतिपदासाठी अत्यंत योग्य आहेत, असे मला वाटते. सर्वांनाच अडवाणी यांच्याविषयी आदर आहे. म्हणून त्यांना सर्वाेच्च स्थानी पाहण्याची इच्छा आहे. मंत्रिमंडळाविषयीच्या प्रश्नावर गडकरी म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी 75 पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद न देण्याचा निर्णय घेतला. ज्याप्रमाणे मेगास्टार अमिताभ बच्चन आता नायकाची भूमिका करत नाहीत. कारण पिढी बदलली आहे. तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांविषयी म्हणता येईल. मुरली मनोहर जोशी यांना नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद हवे होते. त्यावरून मतभेद झाले होते, या वृत्ताचे गडकरी यांनी खंडन केले. जोशीजी आमचे थिंकटँक आहेत. त्यांचा अनुभव, ज्ञान या गोष्टींचा आम्हाला उपयोग होणार आहे.

मंत्री मोदींना घाबरतात का ?
मोदींच्या कामाची शैली वेगळी आहे. त्यामुळे मंत्री मोदींना घाबरतात हा मीडियातील दावा गडकरी यांनी फेटाळला. हे खरे नाही. वास्तव आणि कल्पना अशी ही तफावत म्हणावी लागेल. पंतप्रधान नेहमीच प्रत्येक प्रश्नाला खोलवर भिडतात. त्यामुळे विविध खात्यांचे सचिव मात्र त्यांना घाबरून असतात. एवढे खरे आहे.

अर्थव्यवस्था रूळावर आण्यासाठी कडू औषध
देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच एखादा व्यक्ती कडू औषधाने बरा होणार असेल तर तेच उपयुक्त औषध ठरते. आता हीच वेळ आलेली आहे. एखादी योजना राबवण्यासाठी लागणारा निधी तिजोरीत नाही, असे गडकरी यांनी सांगितले. रेल्वे दरवाढ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांकडून व्यक्त झालेली भूमिका महत्त्वाची ठरते.