आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत बलात्कार झाले तर रेल्वे बंद करणार का? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे वादग्रस्त वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत कॅबमधील बलात्कार प्रकरणानंतर उबर कॅबची सर्व्हिस बंद करण्या प्रकरणी सरकारच्याच दोन मंत्रालयांमध्ये एकवाक्यता नाही. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तर वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी उबर कंपनीवर घालण्यात आलेली बंदी योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच गडकरी म्हणाले, जर रेल्वेत बलात्कार झाला तर काय रेल्वे बंद करणार का? त्यांच्या या वक्तव्याने सरकार महिला सुरक्षेबद्दल किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते असा आरोप विरोधकांनी केला आहे.
याआधी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून वेब आणि अॅप च्या माध्मातून टॅक्सी सेवा देणार्‍या सर्व कंपन्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयाने आपल्या पत्रात म्हटले आहे, की जोपर्यंत या कंपन्यांची कायदेशीर नोंदणी होत नाही तोपर्यंत ही बंदी कायम राहील. त्यासोबतच गृहमंत्रालयाने नागरिकांनाही आवाहन केले आहे, की अशा टॅक्सीची सेवा घेऊ नये.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेबाहेर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले, की जर रेल्वेत बलात्कार झाला तर रेल्वे बंद करणार का? त्यांच्या या वक्तव्याचे संसदेत पडसाद उमटण्याची शक्यता आहे. यासोबतच गडकरींनी देशात 30 टक्के ड्रायव्हिंग लायसन्स बनावट असल्याचाही गौप्यस्फोट केला.