आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जदयूच्या अध्यक्षपदी नितीश यांची निवड, पक्षविस्तार व २०१९ च्या लोकसभेची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची जनता दल युनायटेडच्या(जेडीयू) अध्यक्षपदी रविवारी निवड झाली. पक्षाचा बिहारबाहेर विस्तार आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा तयारीचा भाग म्हणून या निवडीकडे पाहिले जात आहे.

मावळते अध्यक्ष शरद यादव यांनी अध्यक्षपदाच्या चौथ्या टर्मसाठी अनिच्छा व्यक्त केली होती. यादव यांनी १० वर्षे अध्यक्षपद भूषविले. नितीशकुमार यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. नितीशकुमार यांची पहिल्यांदाच प्रादेशिक पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याआधीचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस आणि शरद यादव बिहार बाहेरचे होते, मात्र त्यांचे राजकीय कार्यक्षेत्र बिहार होते. शरद यादव यांनी कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला सरचिटणीस के.सी.त्यागी, जावेद रझा आणि अन्य नेत्यांनी अनुमोदन दिले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर नितीशकुमार यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत जेडीयू-आरजेडी-काँग्रेस आघाडीला विजय मिळवून दिला.
विधानसभा निवडणुकीआधी जनता परिवारातील सहा पक्षांच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र, समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी चर्चेतून माघार घेतली आणि स्वतंत्र निवडणूक लढवली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी जेडीयू उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, राज्यात नितीश कुमार यांनी संपूर्ण दारूबंदी केल्याने महिला वर्ग त्यांच्यावर खूश आहे.