पाटणा/ दिल्ली- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज पाटण्यात मुख्यमंत्रीपदी तिस-यांदा विराजमान होत आहेत. पाटण्यातील गांधी मैदानात नितीशकुमार दुपारी दोन वाजता मुख्यमंत्रीपदाची चौथ्यांदा शपथ घेतील. या शपथविधीची बिहारची राजधानी पाटण्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. नितीशकुमार यांनी या शपथविधी सोहळ्याला देशभरातील राजकीय नेत्यांना निमंत्रण धाडले आहे. खासकरून पंतप्रधान मोदी विरोधकांना नितीशकुमारांनी आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. यातील बहुतेक व सर्व मोदी विरोधक आजच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोदी विरोधक एकवटणार-
नितीशकुमार यांच्या आजच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान
नरेंद्र मोदींच्या विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. यात नितीश-लालूंना यश येत असल्याचे चित्र आहे. या सोहळ्याला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू कश्मीरमधील नेते फारूख अब्दुला, गुलाब नबी आझाद, भारिपचे प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ वकिल व भाजपचे माजी खासदार राम जेठमलानी, अभय चौटाला, सीताराम येचुरी, डी. राजा, शीला दिक्षीत, भूपेंद्र हुडा, शंकरसिंह वाघेला, हेमंत सोरेन, बाबूलाल मरांडी, अजित जोगी, चौधरी अजित सिंग, प्रफुल्ल पटेल, मलिक्कार्जून खरगे, एच के दुवा, राज बब्बर, एम. करूणानिधींचे चिरंजीव टीएमके स्टॅलिन, शिवसेनेचे नेते व मंत्री सुभाष देसाई, रामदास कदम आदी देशातील विविध राजकीय नेते नितीशकुमारांच्या शपथसोहळ्यात शिरकत करणार आहेत.
यासोबतच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगाई, सिक्कीमचे मुख्यमंत्री पी के चामलिंग, मणीपूरचे मुख्यमंत्री ई. इबोबी सिंग, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबम तुकी, ओमर अब्दुला आदी आजी-माजी मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
नितीशकुमार यांनी प्रोटोकॉल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण धाडले आहे. मात्र, त्यांनी नियोजित दौ-याचे कारण सांगून ते नाकारले आहे. केंद्र सरकारच्या वतीने शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू व राजीवप्रताप रूडी हे या सोहळ्यात सहभागी होतील. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनाही निमंत्रण दिले आहे. मात्र, ते या सोहळ्यात सामील होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
मोदींना शह देण्याची तयारी- देशातील भाजपविरोधी व मोदी विरोधकांना एकत्र आणून धर्मनिरपेक्ष पक्षांची मोठ बांधण्याचा प्रयत्न नितीशकुमार यांचा आहे. देशातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांच्या नेत्यांची मोठ बांधून जातीयवादी (?) भाजपला आव्हान देण्याचा काँग्रेसचाही प्रयत्न आहे. नितीशकुमारांच्या निमित्ताने याची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. मोदी व भाजपविरोधात नितीशकुमार एक आघाडी तयार करू शकतात ज्यात काँग्रेससह देशभरातील तमाम विरोधी पक्ष असतील. सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांच्या नेत्यांना एकत्र करून 2019 साली होणा-या देशातील सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शह देण्याची तयारी सुरु झाल्याचे मानले जात आहे.
पुढे स्लाईडवर वाचा यादी जे नितीशकुमारांच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत...