आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar In Delhi Ramlila To Fight For Special Status To Bihar

बिहार प्रश्नावरुन नितीशकुमारांचा केंद्रावर हल्ला; दिल्ली काबीज करण्याची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ज्या राज्यातून देशाच्या सत्तेची सुत्रे हलवली जात होती. जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ जेथे होते. तेथील लोकांना आज आपले गाव, शहर सोडून दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांचा रस्ता का धरावा लागत आहे, असा सवाल जेडी(यू) नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्र सरकारला केला आहे.

नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील रामलीला मैदानावर अधिकार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी आयोजित या रॅलीला संबोधीत करताना त्यांनी बिहारसह सर्वच मागासलेल्या राज्यांच्या विकासाबद्दल टाहो फोडला. यातून आगामी काळात त्यांचा दिल्ली काबीज करण्याचा मनोदय असल्याचे स्पष्ट झाले.

नितीशकुमार म्हणाले, दिल्लीमधील मागास राज्यातील सर्व लोक जर एकत्र आले तर दिल्ली त्यांचीच होईल. ही अधिकार रॅली - हा लढा केवळ बिहारसाठी नसून सर्व मागास राज्यांचा लढा आहे. सर्व जाती, धर्म, पंथ आणि विभागातील लोकांची ही लढाई आहे. विकासाची फळे सर्वांनाच चाखायची आहेत.

बिहारच्या ऐतिहासिक वारशांच्या गौरवपूर्ण उल्लेख करून ते म्हणाले, बिहारींना दिल्लीत येऊन राहण्याची वेळ का आली ? एकेकाळी ज्या बिहारमधून देशाची सुत्रे हलवली जात होती, तेथील नागरिकांना त्यांच्या गावातून परागंदा का व्हावे लागले, याचा सरकार कधी विचार करणार आहे की नाही. (परप्रांतीयांमुळे गुजरातमध्ये गरीबी वाढल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.) स्वातंत्र्यानंतर आमचे मागासलेपण दूर होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत गेले. बिहारचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या फार कमी आहे, ही वस्तूस्थिती त्यांनी मांडली.

ते म्हणाले, दिल्लीच्या दाट वस्त्यांमध्ये बिहारी लोक मोठ्या अडचणींचा सामना करत गुजराण करीत आहे. या लोकांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र आले पाहिजे. आपली एकजूट पाहिल्यानंतरच दिल्लीतील सरकारला जाग येईल. बिहारमध्ये एवढी उत्पदनक्षमता आहे की, संपूर्ण देशाला अन्नधान्याचा पुरवठा करू शकतात. जर केंद्राने बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला तर आम्ही देखील विकसीत राज्यांच्या यादीत येऊ. मात्र, केंद्र सरकार बिहार पर्वतीय राज्य नसल्याचे सांगत मागणी फेटाळत आहे. कित्येक वर्षांपासून ही मागणी केली जात आहे. आम्ही काही भीक मागत नाही, तो आमचा अधिकार आहे. त्यासाठी केद्र सरकारने नियमांमध्ये बदल केले पाहिजे. विकासासाठी नवीन धोरण ठरविले पाहिजे.

चाळीस हजाराहून अधिक बिहारी लोकांनी रॅलीला उपस्थिती लावल्याचा दावा करण्यात आला आहे. नितीशकुमार यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे मंचावर आगमन झाले त्यावेळी जनसमुदायातील एकाने त्यांना काळा झेंडा दाखवला. जेडी(यू) कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीच्या हातातील काळा झेंडा हिसकावून घेत त्याला तिथेच चोप दिला. पोलिसांनी वेळेवर धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.

जेडी(यू)च्या या 'अधिकार रॅली'ला पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते. असे असले तरी, या रॅलीच्या माध्यमातून नितीशकुमार दिल्लीत शक्तीप्रदर्शन करणार असल्याची राजकीय वर्तूळात चर्चा होती. नितीशकुमरांनी मात्र, शक्तीप्रदर्शनाची चर्चा चुकीची असल्याचे सांगत राज्याच्या व्यापक हितासाठी ही रॅली असल्याचे म्हटले आहे.