आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- मागास राज्यांबद्दल मनात कणव असेल तोच नेता दिल्लीच्या सिंहासनावर आरूढ होईल, अशी घोषणा करून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी केंद्रीय राजकारणात नवा डाव टाकला. बिहारला विशेष राज्याच्या दर्जासाठी नव्या पक्षांशी हातमिळवणी करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
राजधानीत रामलीला मैदानावर अधिकार रॅलीत नितीश यांनी शक्तिप्रदर्शन केले. विशेष दर्जा देण्याच्या नियमांत बदल केले तर त्याचा फायदा बिहारच नव्हे, इतर राज्यांनाही होईल, असे ते म्हणाले.'आता नाही तर 2014 नंतर तरी बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावाच लागेल', अशा शब्दांत त्यांनी नव्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले. आमचे हित जपणारे सरकार दिल्लीत असायला हवे. त्यामुळे मागासलेपणाचे मापदंड बदलतील, असेही नितीश यांनी नमूद केले.
भाजपची 'हुंकार रॅली' लांबणीवर- बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी भाजपची नियोजित 'हुंकार रॅली' 15 एप्रिलऐवजी 27 ऑक्टोबरला होणार आहे.
मोदींच्या 'गुजरात मॉडेल'ला आव्हान? - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकास मॉडेलची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, मोदींचे नाव न घेता नितीश यांनी आपले मॉडेल जनसमुदायासमोर मांडले. ते म्हणाले, 'सर्वांना सोबत घेऊन आम्ही वाटचाल करू. जगासमोर विकासाचे एक वेगळे मॉडेल मांडू. हेच मॉडेल भारताच्या खर्या विकासाचे मॉडेल असेल.'
दिल्लीश्वरांनी बिहारची ताकद ओळखावी- दिल्लीत बसलेल्यांनी बिहारींची ताकद ओळखायला हवी. र्मयादित स्रोतांच्या माध्यमातून हे राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्राने आता या राज्याला विशेष दर्जा दिला तर विकसित प्रदेशाच्या नामावलीत बिहार सामील होऊ शकतो, असेही नितीश यांनी नमूद केले.
नव्या राजकीय समीकरणांची नांदी- जदयूच्या एकाही नेत्याने रॅलीत सत्ताधारी यूपीएवर टीका केली नाही. भ्रष्टाचार व महागाईसारख्या मुद्दय़ांना स्पर्शही केला नाही. दुसरीकडे यूपीएनेही नितीश यांची बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी मान्य करण्याचे संकेत दिले.
- विशेष दर्जा देण्यासंबंधी मापदंड बदलण्याची भाषा करून नितीश यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. या नव्या व्यासपीठावर तिघे एकत्र येऊ शकतील, असा संदेशच त्यांनी एक प्रकारे दिला.
- बिहारमध्ये नितीश यांची भाजपशी युती आहे. मात्र, व्यासपीठावर एकही भाजप नेता उपस्थित नव्हता. संपूर्ण भाषणात त्यांनी एनडीए सरकार स्थापन होईल आणि बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळेल, याबद्दल शब्दही उच्चरला नाही.
एनडीएच्या बॅनरखाली सभा हवी होती : शत्रुघ्न- दिल्लीतील अधिकार रॅलीवरून जदयू-भाजपमधील मतभेद समोर आले आहेत. भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, 'बिहारच्या विकासात भाजपचाही वाटा आहे. विशेष दर्जाची मागणी घेऊन एनडीएच्या बॅनरखाली ही जाहीर सभा झाली असती तर अधिक योग्य ठरले असते.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.