आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाती, धर्माच्या आधारे लष्करात भरती नाही; लष्कराचे स्पष्टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय लष्करामध्ये जात, धर्म आणि प्रादेशिक आधारावर भरती करण्यात येत नाही. केवळ प्रशासकीय सोयीसाठी आणि सुरळीत संचालनाची गरज म्हणून लोकांचे त्या त्या प्रदेशानुसार गट पाडले जातात, असे स्पष्टीकरण लष्कराच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात देण्यात आले.

मराठा रेजिमेंट, राजस्थान रायफल्स, डोग्रा रेजिमेंट आणि जाट रेजिमेंट यासारख्या विविध रेजिमेंटमध्ये भरतीसाठी लष्करात ‘भेदभावमूलक वर्गीकरण’ करण्यात येत असल्याचा आरोप लष्कराने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात फेटाळून लावला आहे. पात्रतेच्या अटींच्या अधीन राहून देशातील सर्व नागरिक नियमित लष्करात भरती होण्यास पात्र आहेत. धर्म, जात, वंश, लिंग, जन्माचे ठिकाण अथवा अन्य कोणत्याही आधारावर भरतीसाठी भेदभाव करण्यात येत नाही, असे या शपथपत्रात लष्कराने म्हटले आहे. हरियाणातील रेवाडी येथील डॉक्टर आय. एस. यादव यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत जात, धर्म आणि प्रदेशाच्या आधारावर लष्करात भरती करण्याचा निकष काढून टाकण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने लष्कराला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. नौदल आणि हवाई दलात असा भेदभाव करण्यात येत नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. याचिकाकर्त्याचे मत चुकीचे असून डोग्रा, गढवाल रायफल्स आणि मद्रास रेजिमेंट या जातीच्या आधारावर नव्हे तर प्रदेशाच्या आधारावर आहेत.