आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीआयसी, सीव्हीसी नियुक्त्या लांबणीवर, मोदींच्या अध्यक्षतेखालील बैठक निष्फळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गेल्या नऊ महिन्यांपासून रिक्त असलेल्या केंद्रीय दक्षता आयुक्त(सीव्हीसी) व केंद्रीय माहिती आयुक्तांच्या (सीआयसी) नियुक्त्यांबाबत केंद्र सरकार गंभीर नसल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने होत असल्याने मोदी सरकारने त्या दिशेने कार्यावाही सुरू केली आहे. परंतु शनिवारी त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली उच्चस्तरीय समितीची बैठक कुठल्याही निर्णयाविना पार पडली. या पदांसाठीच्या अर्जदारांबाबत अधिक माहिती मागवण्यावर बैठकीत सहमती झाली. याबाबत पुढील आठवड्यात पुन्हा बैठक होणार असून त्यात ही रिक्त पदे भरण्याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

सीव्हीसी, सीआयसींच्या नियुक्त्यांबाबत उच्चस्तरीय समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झाली. त्यात गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे, कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह तसेच पंतप्रधान कार्यालयाचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते. या नियुक्त्यांच्या विलंबाबाबत सरकार काँग्रेसच्या निशाण्यावर आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, अशा स्वरुपाच्या नियुक्त्यांमध्ये उमेदवारांची यादी मोठी असते. विचार करण्यास वेळ लागतो. त्यावर खरगे म्हणाले की, उमेदवारांची यादी छोटी ठेवण्याची सूचना मी केली होती.जेणे करून त्यावर सहजतेने चर्चा होऊ शकेल. सीआयसीच्या पदासाठी २०३ तर तीन माहिती आयुक्तांच्या पदासाठी ५५३ अर्ज आले आहेत. मुख्य दक्षता आयुक्त व दक्षता आयुक्तांसाठी १३० अर्ज आले आहेत.

सरकार गंभीर नाही : अग्रवाल यांचा आरोप
दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते सुभाष चंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, "आधीचे मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्ला यांनी राजीनामा दिला होता. तेव्हा केंद्र सरकारने हे पद एकदिवसदेखील रिक्त ठेवता येणार नाही, असे म्हणत त्यांचा राजीनामा फेटाळला होता. परंतु आता नऊ महिने उलटून गेले तरीही ही पदे रिक्त आहेत. यावरून हे स्पष्ट होते की सरकार त्याबाबत किती गंभीर आहे. '

अधिकारी निवृत्त, नियुक्त्या प्रलंबित
मुख्य माहिती आयुक्त पदावरील राजीव माथूर यांचा कार्यकाळ २२ ऑगस्ट २०१४ रोजी संपला होता. तेव्हापासून ते पद रिक्त आहे. माहिती आयुक्तांची तीन पदेदेखील रिक्त आहेत. सीआयसीमध्ये एक मुख्य माहिती आयुक्त व दहा माहिती आयुक्त असतात. दक्षता आयुक्त प्रदीप कुमार २८ सप्टेंबर रोजी िनवृत्त झाले. तेव्हापासून ही पदे रिक्त आहेत. सध्या सीआयएसफचे माजी महासंचालक राजीव अंतरिम प्रमुख आहेत.

सरकार विलंंब करत नाही : जेटली
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या विलंबाचा आरोप फेटाळून लावला. सरकार ही पदे भरण्यासाठी वेळ लावत नाही. ही दोन्ही प्रकरणे न्यायालयात होती. सीव्हीसीच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी परवानगी दिली. तर सीआयसीच्या मुद्यावर दिल्ली उच्च न्यायालयात तीन दिवसांपूर्वी सुनावणी पूर्ण झाल्याचे जेटली म्हणाले. त्यानंतर तातडीने ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...