नवी दिल्ली - विमा विधेयकाच्या मुद्द्यावर काँग्रेस दुटप्पी भूमिका घेत असल्याचा भाजपन केलेला आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी फेटाळला. उलट सरकार यावर दुहेरी भूमिका घेत असेल तर काँग्रेस तीव्र विरोध करेल, असा इशारा त्यांनी दिला.
संसदेत पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी विमा विधेयकावर सरकारच्या भूमिकेवर परखड भाष्य केले. ते म्हणाले, 2008 मध्ये भाजप जेव्हा विरोधी बाकावर होता तेव्हा याच विधेयकाला त्यांनी प्रचंड विरोध केला होतो. आता तेच विधेयक थोडा फार बदल करून मांडताना मात्र काँग्रेसवर आरोप केले जात आहेत.
हे विधेयक निवड समितीकडे सोपवण्यात यावे, असा काँग्रेससह विरोधी पक्षांचा आग्रह आहे. मात्र, सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. सोमवारी राज्यसभेत मांडण्यात आलेले हे विमा विधेयक विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात एका मुद्दड्यावर सहमती न झाल्याने लटकून राहिले आहे. मूळ विधेयकामध्ये बदल केल्यामुळे कॉँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
विमा क्षेत्रात एफडीआय काँग्रेसला मान्य
विमा क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्याला काँग्रेस अनुकूल आहे. मात्र, सरकारने या मूळ विधेयकात अनावश्यक बदल केल्यामुळे काँग्रेसने आक्षेप घेतला असल्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले.
विधेयक वेगळे नाही
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी असा दावा केला आहे की, राज्यसभेत मांडण्यात आलेले विमा विधेयक काँग्रेसच्या राजवटीत तयार केलेल्या विधेयकापेक्षा वेगळे नाही. मात्र, काँग्रेसला यातील काही मुद्द्यांवर आक्षेप आहे.