आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Fear To UPA Government, Loksabha Election Held In May

यूपीए सरकारला धोका नाही, लोकसभा निवडणूक मे महिन्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तेलंगणाविरोधक खासदारांनी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणला तरीही यूपीए सरकारला धोका नाही. आमच्याकडे पुरेसे बहुमत आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका नियोजित समयी अर्थात मे महिन्यातच होतील, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तेलंगणा निर्मितीला विरोध करणा-या आंध्र प्रदेशातील खासदारांनी यूपीए सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्याला काही काँग्रेस खासदारांचीही साथ आहे. तेलगू देसमच्या चार खासदारांनीही अविश्वास प्रस्तावाची नोटीस लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांच्याकडे दिली आहे. लोकसभा निवडणुका नियोजित वेळेपूर्वी होऊ शकतात, अशी चर्चा सध्या आहे; परंतु या निव्वळ वावड्या असून यूपीए सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि निवडणुका नियोजित समयी मे महिन्यात होतील, असे केंद्रीय संसदीय व्यवहारमंत्री कमलनाथ यांनी सांगितले, तर लोकसभा निवडणुकीसाठी आता केवळ तीन-चार महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे आंध्रातील खासदारांच्या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्यात क ोणत्याही राजकीय पक्षाला रस नसणार. त्यामुळे प्रस्ताव संसदेत फेटाळला जाईल, असा विश्वास काँग्रेस प्रवक्ते पी. सी. चाको यांनी व्यक्त केला.
तिस-या दिवशीही संसद ठप्प
स्वतंत्र तेलंगणासह मुजफ्फरनगर मदत छावणीतील 40 मुलांच्या मृत्यूवरून संसद तिस-या दिवशीही ठप्प झाली. या गोंधळामुळे अविश्वास प्रस्तावाची नोटीस विचारात घेण्यात आली नाही.
बहुजन समाज पार्टीने मुजफ्फरनगर मदत छावणीचा मुद्दा लावून धरला आहे. बसपाला शह देण्यासाठी समाजवादी पार्टीने बुधवारी लोकसभा व राज्यसभेमध्ये 17 मागासवर्गीय जातींना अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याचा मुद्दा उपस्थित केला. द्रमुक खासदारांनी कच्छथिवू बेट श्रीलंकेकडून परत घेण्याची मागणी करणारे पोस्टर्स फडकावले. तसेच श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मच्छिमारांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी त्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी केली. राजद नेते रघुवंशप्रसाद सिंग यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना हटवून परीक्षेच्या काही अटी शिथिल करण्याची मागणी केली.
अविश्वास प्रस्तावाच्या तीन नोटिसा : सीमांध्रातील खासदारांनी ‘सेव्ह आंध्र प्रदेश’ लिहिलेली पोस्टर्स दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. वायएसआर कॉँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी घोषणा देत होते. आंध्र प्रदेशचे विभाजन टाळण्यासाठी कॉँग्रेसचे खासदार आर. संबासिव राव यांच्यासह सीमांध्रातील पाच खासदार तसेच तेलगु देसमचे खासदार एम. वेणुगोपाल रेड्डी आणि वायएसआर कॉँग्रेसचे खासदार एम. राजमोहन रेड्डी यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. गोंधळामुळे नोटीस पटलावर आली नाही.