आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्यातील श्वान निवृत्तीनंतरही जगणार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सैन्यातून सेवानिवृत्त होणा-या श्वानांना आता मारले जाणार नाही. यासंबंधी लवकरच धोरण आखले जाईल, असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. व्यवसायाने वकील असलेल्या संजयकुमार सिंह यांनी यासंबंधी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या श्वानांना ठार केले जाते, हीच परंपरा आहे. एखाद्या सैनिकाप्रमाणेच ते श्वान देशाचे संरक्षण करते. सीमेवर गस्तीदरम्यान त्यांच्या जिवाला तितकाच धोका असतो. काही वेळा त्यांना अपंगत्वही येते. अशा श्वानांना सेवानिवृत्तीनंतर ठार करणे क्रूरपणा असल्याची भूमिका या जनहित याचिकेत मांडण्यात आली. सरकारने यासाठी योग्य धोरण आखावे, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली. न्यायमूर्ती जी. रोहिणी आणि जयंत नाथ यांच्या पीठाने सरकारकडे यासंबंधी खुलासा मागवला. सरकारच्या वतीने अॅडिशनल सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी खुलासा केला. संरक्षण मंत्रालय यासंबंधी लवकरच नवे धोरण तयार करेल, असे जैन यांनी न्यायालयासमोर सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी ९ सप्टेंबरला होईल.

सैन्यात ३ प्रजातींच्या श्वानांचा वापर : सैन्याच्या विविध प्रदेशांतील गस्तीसाठी लॅब्राडोर, जर्मन शेफर्ड आणि बेल्जियन शेफर्ड या तीन प्रजातींच्या श्वानांचा वापर होतो.

त्यांचा त्रास होत नसेल, तर ठार करू नये
उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सेवानिवृत्त श्वानापासून कोणाला त्रास होत नसेल तर त्याला ठार करू नये, असे म्हटले आहे. सैनिक, नागरिक, कुत्र्यांना प्रशिक्षण देणारे कर्मचारी अथवा इतर श्वानांना त्यांच्यापासून धोका नसल्यास ठार करू नये, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. विनाकारण त्यांना ठार करणे हे प्राणी हक्क कायदा १९६० च्या विरुद्ध आहे.