नवी दिल्ली - केंद्रीय माहिती व प्रसारण विभागात प्रतिनियुक्तीवर सहसचिव असलेल्या आभा शुक्ला यांनी मंगळवारी महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. २ ऑक्टोबर रोजी त्यांचे पती लोकेश चंद्र यांना याच सदनात गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सदनात मराठीच सनदी अधिकारी असावा असा अट्टहास धरणा-या भाजप-शिवसेनेने अमराठी दांपत्याची नियुक्ती होताना तोंडावर बोटे ठेवली.
आभा शुक्ला व लोकेश चंद्र हे दांपत्य १९९३ च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी आहेत. गेली सात वर्षे ते केंद्रातील विविध पदावर दिल्लीत प्रतिनियुक्तीवर होते.
महाराष्ट्र कॅडरचे अनेक सनदी अधिकारी हे प्रारंभी जिल्हाधिकारी आणि उपसचिवपर्यंतच्या सेवा दिल्यानंतर त्यांच्या पाल्यांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून दिल्लीची निवड करतात. परंतु केंद्रातील प्रतिनियुक्ती ही सात वर्षांच्या वर मिळत नसल्याने महाराष्ट्र सदन या अधिका-यांना नियुक्तीसाठी सोयीचे ठरते. महाराष्ट्र सदनात आयएएस अधिका-यांसाठी निवासी आयुक्त व राजशिष्टाचार आयुक्त असे दोन पदे आहेत. एकाच कार्यालयातील दोन्ही पदावर नियुक्ती होणारे आभा शुक्ला आणि लोकेश चंद्र हे एकमेव दांपत्य ठरले आहे. या दोघांना दिल्लीत पुन्हा पाच वर्षे काढता येतील.