आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Non Veg Party At Delhi Maharashtra Sadan, Maharashtra Sleet Issue

गारपीटग्रस्तांच्या नावाने राज्य मंत्र्यांची ‘नॉनव्हेज’ दिल्ली वारी; अधिकारी निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या दुपारच्या जेवणात मासे-मटण कमी पडल्याची शिक्षा म्हणून की काय, महाराष्ट्र सदनाच्या एका अधिकार्‍याला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. ‘कर्तव्यदक्षतेत निष्काळजीपणा’ केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली. गारपीटग्रस्तांची कैफियत मांडण्यासाठी दिल्लीत आलेल्या या मंत्र्यांच्या जेवणावर 90 हजार रुपये खर्च झाल्याची माहिती जाणकार सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त व प्रधान सचिव बिपिन मल्लिक यांनी शनिवारी सायंकाळी तातडीचा आदेश काढून महाराष्ट्र सदनाचे सहायक व्यवस्थापक अरुण कालगावकर यांना निलंबित केले. ‘दिव्य मराठी’ला मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या दुपारच्या जेवणात मासे आणि मटणाचा तुटवडा पडल्याने
ही कारवाई करण्यात आली असल्याचे कळते. निसर्गाचा कोप झाल्याने महाराष्ट्रातील जनतेवर कणव दाखवत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख दिल्लीत आले. सकाळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मंत्री विश्रांतीसाठी महाराष्ट्र सदनात पोहोचले. याचवेळी निवासी आयुक्त मल्लिक यांनी आजी-माजी सनदी अधिकार्‍यांसाठी आयोजित केलेली पार्टी सुरू होती. त्यामुळे यंत्रणा अधिकार्‍यांच्या दिमतीला लागली होती.

पुढाकार घेतला, अंगलट आला!
आचारसंहितेमुळे मंत्र्यांच्या दिमतीला कोणीही नाही हे पाहून सदनाचे सहायक व्यवस्थापक (गृहसज्जा) अरुण कालगावकर यांनी स्वत: पुढाकार घेत काय हवे, काय नको याबाबत मंत्र्यांना विचारपूस केली. सूत्रांनुसार, मुख्यमंत्र्यांच्या कक्षातच सर्व मंत्र्यांसाठी दुपारी दीड वाजता जेवण बोलावण्यात आले. परंतु रोजगाराची हमी देणार्‍या मंत्र्याला मासे खाण्याची इच्छा झाली. त्यांच्या आदेशानुसार एक प्लेट मासे आले. कोंबडीवर ताव मारत असलेल्या मंत्र्यांच्या तोंडालाही मासे पाहून पाणी सुटले. त्यांनीही माशांकडे मोर्चा वळवला. पुन्हा मासे आणण्याचे फर्मान सोडण्यात आले, परंतु मंत्र्यांच्या ऑर्डरकडे दुर्लक्ष झाले. शेवटी टेबलवरील ‘नॉनव्हेज’ आणि ‘व्हेज’वरच मंत्र्यांना समाधान मानावे लागले. मंत्र्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निवासी आयुक्तांना सुनावले. निवासी आयुक्तांनी मग कालगावकर यांनाच निलंबित करून टाकले. शनिवारी सायकांळी कालगावकरांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करीत निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाईचे कारण वेगळे दाखविले जाईल, हा भाग निराळा.