आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशान्यकडील नकट्या नाकाचे लोकही हिंदुस्थानीच - सुषमा स्वराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभेत एकीकडे गोंधळ सुरू असताना विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी ईशान्येकडील नागरिकांवरच्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. नकट्या नाकाचे लोकही हिंदुस्थानीच असतात असे सांगून आपल्या मुद्द्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी अनेक उदाहरणेही दिली. अरुणाचल प्रदेशचा विद्यार्थी नीदो तानियाम याची काही दिवसांपूर्वी दिल्लीत हत्या झाली.त्यापाठोपाठ मणिपूरच्या दोन विद्यार्थिनींचाही विनयभंग झाल्याची घटना घडली. बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासात सुषमा स्वराज यांनी हा मुद्दा उपस्थित केला. भारताच्या ज्या विविधतेबाबत आपल्याला अभिमान वाटतो तो दिल्लीतील लोकांनी समजून घेतला पाहिजेच. सरळ,टोकदार नाकाचे हिंदुस्थानी असतील तर नकट्या नाकाचे लोकही हिंदुस्थानीच आहेत हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. गंगा-यमुनेच्या किना-यावर राहणारा हिंदुस्थानी असेल तर ब्रह्मपुत्रेच्या तीरावर राहणारेही हिंदुस्थानीच आहेत.हा देश एक आहे. अशा शब्दात त्यांनी दिल्लीकरांना कानपिचक्या दिल्या. केजरीवाल व राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका के ली. दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री धरणे देतात. केंद्र सरकारचे नेतृत्व करणारा नेताही धरणे आंदोलनाच्या ठिकाणी जातो.ज्यांच्यावर दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी आहे तेच धरणे आंदोलन करतात, असे स्वराज म्हणाल्या.
* तेलंगणा, आरक्षणावरून संसद ठप्प
* पहिला दिवस गोंधळाचा
15 लोकसभेच्या अखेरच्या संसद अधिवेशनाचा पहिला दिवस गोंधळातच वाया गेला. तेलंगणा आणि काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी, गदारोळ करून कामकाज बंद पाडले.लोकसभेत कामकाजच झाले नाही तर राज्यसभेतही फारच थोडावेळ काम चालले.
राज्यसभेत जातीयवादविरोधी विधेयक आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी हाणून पाडला. सरकारने हे विधेयक बासनात गुंडाळून ठेवले.त्याशिवाय काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन व्दिवेदी यांच्या वादग्रस्त विधानावरून सपा,बसपा आणि जदयूच्या सदस्यांनी राज्यभेत गोंधळ घातला. जातीय आधारावरील आरक्षण रद्द करून आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन व्दिवेदी यांनी मंगळवारी केली होती. मात्र विद्यमान आरक्षणाचे धोरणच यापुढेही कायम राहणार असून त्या धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. संरक्षण मंत्री ए.के.अ‍ॅटनी यांनीही ऑगस्टावेस्टलँड प्रकरणी निवेदन दिले. हेलिकॉप्टर घोटाळ्याचा तपास करण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गाने पाठपुरावा के ला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
* तेलंगणा समर्थक-विरोधकांची एकजूट
तेलंगणा निर्मितीच्या मुद्द्यावर त्या भागातील समर्थक खासदार आणि सीमांध्र भागातील विरोधक खासदार पक्षाभिनिवेश सोडून दोन्ही सभागृहांत घोषणाबाजी करीत होते. सीमांध्र भागातील खासदारांनी जय सम्यक आंध्र प्रदेशचे फलक आणले होते, तर तेलंगणाचे खासदार स्वतंत्र राज्य निर्मितीसाठी घोषणाबाजी करीत होते.
* पुढील आठवड्यात विधेयक
वादग्रस्त स्वतंत्र तेलंगणा विधेयक पुढील आठवड्यात संसदेच्या पटलावर मांडले जाणार आहे. स्वतंत्र तेलंगणास आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डींसह सीमांध्र भागातील काँग्रेस नेत्यांचाच विरोध असल्यामुळे हे विधेयक पारित होण्यासाठी केंद्र सरकारला काँग्रेस नेत्यांच्याच नाकदु-या काढाव्या लागणार आहेत.