नवी दिल्ली/ मुंबई / चेन्नई / कोलकाता - निश्चित मर्यादेपेक्षा १७ पटींनी अधिक प्रमाणात मोनोसोडियम ग्लुटामेट आणि शिसे हे आरोग्यास घातक घटक आढळल्यामुळे वादाच्या भोव-यात सापडलेल्या मॅगी नूडल्सची बुधवारी आणखी चव गेली. लष्कराने जवानांना मॅगी टाळण्याचा सल्ला दिला. सीएसडी कँटीनमध्ये विक्रीवर बंदीही घातली. दिल्ली सरकारने मॅगी नूडल्स विक्रीवर पंधरा दिवसांसाठी बंदी घातली आहे, तर देशभरातील बिग बाजारच्या स्टोअरमध्ये मॅगीची विक्री थांबवण्यात आली आहे.
केंद्र सरकारने बुधवारी पहिल्यांदाच राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे (एनसीआरडीसी) लेखी तक्रार केली आहे. त्यात नेस्ले इंडियाने अन्न सुरक्षा मानकाचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. दिल्ली सरकारने नेस्लेला १५ दिवसांच्या आत सध्याचा साठा काढून घेण्याचे फर्मान सोडले आहे. केंद्रीय भांडारांमध्ये मॅगी विक्रीवर बंदी घातली आहे. या वादाचा परिणाम नेस्ले इंडियाच्या शेअरवरही झाला. नेस्लेच्या शेअर्सची किंमत १० टक्क्यांनी गडगडली. एक दिवसातच कंपनीचे बाजारातील भांडवल ६००० कोटींनी कमी झाले. बिग बाजार ही सर्वात मोठी रिटेल चेन चालवणा-या फ्युचर समूहाने देशभरातील स्टोअर्समध्ये मॅगीची विक्री थांबवली. ईझी डे, केबी, निलगिरी आदी स्टोअर्स याच समूहाचे आहेत.
महाराष्ट्र सरकारचा निर्णय शुक्रवारी
राज्यात मॅगीचे अाठ नमुने तपासणीसाठी पुणे प्रयाेगशाळेत पाठवले अाहेत. त्यापैकी दाेन नमुन्यांच्या तपासणीत अाराेग्यास घातक पदार्थ अाढळले नाहीत. त्यामुळे सरकारने मॅगीवर कारवाई केली नाही. अाणखी सहा नमुन्यांचा अहवाल शुक्रवारी येईल. त्यानंतरच बंदीबाबत निर्णय होईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. सरकारने मॅगीला क्लीन चिट दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे आणि नाशिक येथील नमुने तपासणीसाठी पाठवले अाहेत. अन्न व अाैषध प्रशासनाचे अायुक्त हर्षदीप कांबळे यांनीही शुक्रवारनंतरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
अमिताभ आणि नेस्लेचाही खुलासा
मला मॅगीबाबत कोणतीही नोटीस मिळालेली नाही. दोन वर्षांपूर्वीच मी मॅगीची जाहिरात बंद केली आहे, असे मॅगीचे ब्रॅंड अम्बेसेडर अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. बिहारच्या एका न्यायालयाने अमिताभ, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. तर आम्ही आमच्या पातळीवर तपासणी केली. त्यात मॅगी खाण्यायोग्य असल्याचे आढळून आले, असे नेस्ले इंडियाने म्हटले आहे. अनेक राज्यांच्या आजपर्यंतच्या चौकशीत मॅगीत १० ते १७ पट अधिक शिसे आढळून आले आहे.
पुढे वाचा, विलंबामुळे तक्रार : केंद्र